छत्रपती संभाजीनगर : उपोषण करते मनोज जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. यावेळी ते उपोषणकरते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमध्ये एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारावेळी अनेक राजकीय नेत्यांनी त्यांची रुग्णालयात भेट घेतली आहे. आता देवेंद्र फडणवीस मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.(Devendra Fadanvis)
आंतरवाली सराटीत उपोषणावेळी मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांच्या भेटी
मनोज जरांगे पाटील यांचे आंतरवाली सराटीत उपोषण सुरू असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी तसेच मंत्र्यांनी भेट दिली होती. मात्र, अंतरवलीतील दोन्ही उपोषणावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणाला एकदाही भेट दिली नाही. आता मात्र रुग्णालयात भेटतील असे तर्क वितर्क सुरु आहेत.
‘या’ कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीनगरमध्ये जाणार
छत्रपती संभाजीनगरच्या आयोध्या नगरी मैदानावर आज बागेश्वर बाबांच्या दरबाराचा समारोप होणार असून याच कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस येत असल्याचे भाजपकडून वेगवेगळ्या वृत्तपत्रात जाहिराती देण्यात आल्या आहेत. यावेळी फडणवीस यांच्या हस्ते आरती केली जाणार आहे. शहरातील आयोध्या नगरी मैदानावर बागेश्वर धाम बाबा यांचे ३ दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.