ST Workers Strike: मुंबई : ऐन दिवाळीत एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वातील एसटी कष्टकरी जनसंघ या एसटी कामगार संघटनेने 6 नोव्हेंबरपासून संपाची हाक दिली आहे. या संपात मोठ्या प्रमाणावर एसटी कर्मचारी-कामगार सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे एसटी प्रवाशांसह महामंडळालाही याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
दोन वर्षांपूर्वी एसटी महामंडळाचे विलिनीकरण, सातवा वेतन आयोग, आदींसह विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. एसटी कर्मचाऱ्यांच्या या संपात वकील असलेल्या गुणरत्न सदावर्ते यांनी उडी घेतली. हा संप मिटल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांची संघटना त्यांनी सुरू केली. आता, सदावर्ते यांनी संपाची हाक दिली आहे. सदावर्ते यांनी सांगितले की, सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात 85 टक्के नादुरुस्त बस धावत आहे. सातवा वेतन आयोग आणि इतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. या संपात 68 हजार कर्मचारी सहभागी होणार असल्याचे सदावर्ते यांनी सांगितले.
गेल्या काही महिन्यापासून एसटी महामंडळाकडे प्रवाशांचा ओढा वाढला आहे. परिणामी एसटी महामंडळाच्या उत्पन्नात मोठी वाढ होत आहे. दिवाळीच्या निमित्ताने गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाकडून अतिरिक्त वाहतूक चालवली जाते. त्यामुळे दिवाळीच्या हंगामात एसटीच्या महसुलात वाढ होत असते. अशातच एसटीच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा दिवाळीत संप पुकारल्यास एसटी महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.