पुणे : तुम्ही चांदणी चौकातून जाणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण पुण्यातील (Pune) चांदणी चौकातील पूल आजपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
हा पूल लवकरच पाडण्यात येणार आहे. चांदणी चौकातील वाहतुक कोंडीला कारणीभूत ठरणारा हा पूल लवकरच पाडण्यात येणार आहे. त्यापूर्वी प्रायोगिक तत्वावर इथल्या वाहतुकीत बदल करण्यात आलेत. आजपासून या पुलावरची वाहतूक करण्यात येणार बंद आहे.
त्यामुळे कोथरुड किंवा सातारा रस्त्यावरुन बावधन, पाषाणकडे जाण्यासाठी किमान दिड किलोमीटरचा वळसा घेऊन मुळशीकडून साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर उतरावे लागणार आहे. तेथून डावीकडे वळून नागरीकांना बावधन, पाषाणकडे जाता येईल.
पूल पाडण्याचे काम नोएडा येथील जुळे मनोरे पाडणाऱ्या खासगी कंपनीला देण्यात आले आहे. त्यानुसार संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्याच्या चांदणी चौकात पुलाची पाहणी केली. हा पूल स्फोटकांच्या साह्याने पाडता येईल किंवा कसे, याची पाहणी अधिकाऱ्यांनी केली आहे.
त्याचा अहवाल प्रशासनाला सादर झाल्यानंतरच पूल पाडण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. संबंधित कंपनीचे तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी चांदणी चौकात पुन्हा पाहणी केली. पूल पाडण्याबाबत संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठका झाल्या असून येत्या दोन दिवसांत ते महामार्ग प्राधिकरणाला संपूर्ण आराखडा सादर करणार आहेत. साधनसामग्री उपलब्ध झाल्यावर पाडकामापूर्वीची तयारी सुरू करण्यात येणार आहे.