पुणे : परदेशात फिरायला पाठवतो, असे सांगून पैसे घेऊन अनेकांची 15 लाख 46 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार हडपसर परिसरात उघडकीला आला आहे. आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी ट्रॅव्हल्स एजंटवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हडपसर येथील डेक्कानंदिनी हॉलिडेज या ट्रॅव्हल कंपनीच्या कार्यालयात हा प्रकार घडला आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, तुकाराम मल्हारी नरवडे (वय 48, खराडकर पार्क, खराडी, पुणे) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात गुरुवारी फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रॅव्हल एजंट मिलींद जोशी (रा. गंधर्व रेसीडेन्सी, भोसले गार्डन, हडपसर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांच्यासह मित्रमंडळींना परदेशात भटकंतीसाठी जायचे होते. आरोपी ट्रॅव्हल एजंट मिलींद जोशी याने फिर्यादी व इतरांना फिरण्यास पाठवण्याच्या बहाण्याने तसेच परदेशी चलन बदलून देण्याच्या बहाण्याने वेळोवेळी 15 लाख 46 हजार 199 रुपये घेतले. त्यानंतर फिर्यादी व इतरांना परदेशात पाठवले नाही तसेच परदेशी चलन देखील दिले नाही. फिर्यादी यांनी पैसे परत मागितले असता, पैसे देण्यास टाळाटाळ करुन आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी ट्रॅव्हल्स एजंटवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.