पुणे : माढा लोकसभा मतदारसंघातील कापसेवाडी येथे १६ नोव्हेंबरला होणाऱ्या शेतकरी मेळाव्याला शरद पवार उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याला सोलापूर, उस्मानाबाद आणि सांगली जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित राहणार आहेत. बेदाण्याचे कोसळलेले दर, टॉमेटो उत्पादकांची व्यथा तसेच दूध उत्पादकांना दर कमी झाल्याने बसलेला फटका, यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार कापसेवाडीत शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत.
राज्यातील शेतकरी कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटामुळे आर्थिक गर्तेत अडकतात. त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शरद पवार शेताच्या बांधावर जाणार आहेत. सध्या राज्यात २ लाख ५७ हजार टन बेदाण्याचे उत्पादन झाले आहे. यातील तब्बल ९४ हजार टन बेदाणा योग्य दर मिळत नसल्याने अजुनही कोल्ड स्टोरेजमध्ये पडून आहे. याबाबत शेतकऱ्यांनी बेदाण्यावरील निर्यात शुल्क कमी करुन आयात शुल्क वाढवण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, द्राक्ष उत्पादक शेतकरी कृषीनिष्ठ परिवाराचे नितीन बापू कापसे यांच्यासह काही शेतकऱ्यांनी आज मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर शरद पवार यांनी तातडीने कापसेवाडी येथील मेळाव्याला येण्याचे मान्य केल्याची माहिती नितीन बापू कापसे यांनी दिली.
बेदाण्याचे दर कोसळले आहेत. टॉमेटोचे दरही कोसळले आहेत. दुध उत्पादक दर कमी झाल्याने अडचणीत आले आहेत. या सर्व शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी शरद पवार कापसेवाडीत येणार आहेत. यापूर्वी २३ ऑक्टोबरला शरद पवार कापसेवाडीत येणार असे नियोजन होते. मात्र, अचानक त्यांचा दौरा रद्द झाला होता. त्यांच्या माढा दौऱ्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती. २३ ऑक्टोबरच्या दौऱ्याची संपूर्ण तयारी देखील आयोजकांकडून करण्यात आली होती. मात्र, शरद पवारांचा दौरा अचानक रद्द झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.