मुंबई: पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात लोणी काळभोर येथे अपर तहसील कार्यालय स्थापन करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्याबाबत शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे. लोणी काळभोर अपर तहसीलदार यांच्या कार्य क्षेत्रात वाघोली, उरुळीकांचन आणि थेऊर ही महसुली मंडळे येणार आहेत. यामध्ये एकूण 44 महसुली गावांचा समावेश आहे.
पुणे जिल्ह्यातील हवेली या तालुक्याचा भौगोलिकदृष्ट्या विस्तार मोठा आहे. सदर तालुक्याचे वाढते शहरीकरण व वाढत्या प्रशासकीय कामकाजामुळे प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील मौजे लोणी काळभोर येथे स्वतंत्र अपर तहसील कार्यालय स्थापन करुन त्याकरीता आवश्यक पदांची निर्मिती करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्याला आज राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे हवेली तहसीलदार यांच्या कामाचा भार हलका होणार असून प्रशासकीय कामाला गती येणार आहे.
पूर्व हवेलीसाठी लोणी काळभोर येथे मान्यता मिळालेल्या अप्पर तहसील कार्यालयाचे नागरिकांच्याकडून मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे. लोणी काळभोर, उरुळी कांचन, लोणी कंदसह पूर्व हवेलीतील 44 हून अधिक गावातील नागरिकांची महसुली कामे लोणी काळभोर येथील महसुली कार्यालयातून होणार असल्याने पूर्व हवेलीमधून विविध गावचे सरपंच, संघटना यांनी वरील निर्णयाचे स्वागत केले आहे.
हवेली तालुक्याची लोकसंख्या व अधिकाऱ्यांच्यावर असलेला कामाचा बोजा लक्षात घेता शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी मार्च 2022 मध्ये विधानसभेत पूर्व हवेलीसाठी स्वतंत्र अप्पर तहसीलदार कार्यालयाची मागणी केली होती. या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी या प्रश्नाला हिरवा कंदील देत लवकरच सुरु करण्यात येईल असे सांगितले होते.
दरम्यान, हवेली तहसील कार्यालयात दैनंदीन कामकाज संदर्भात दर महिन्याला साधारणत: 7 ते 8 हजार विविध अर्ज प्राप्त होतात. तर शिक्षा पत्रिका मिळणेसाठी दरमहा साधारणत: 400 ते 500 प्राप्त होतात. हवेली तहसिल कार्यालय नागरीक सुविधा केंद्रातर्फे दरमहा विविध प्रकारचे साधारणत: 6000 दाखले दिले जातात. वाढती लोकसंख्या नागरीकरण, शहरीकरण इ. बाबी विचारात घेता परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी तसेच प्रशासकीय यंत्रणा सक्षम करण्यासाठी हवेली तालुक्यासाठी स्वतंत्र अपर तहसिल कार्यालयास मान्यता देण्यात आली आहे.
लोणी काळभोरला अप्पर तहसील कार्यालयाला मान्यता मिळालेल्या निर्णयाचे स्वागत आमदार अशोक पवार यांनी केले आहे. आमदार पवार म्हणाले की, हवेली तालुक्याच्या पूर्व भागातील नागरिकांची तहसीलदार कार्यालयातील कामे सोयीस्कर व लवकर होण्यासाठी हवेली तालुक्याचे अप्पर तहसीलदार कार्यालय तातडीने करावे अशी मागणी गेली अनेक वर्षे लावून धरली होती. या मागणीला यश आले आहे. हवेली तालुक्याची लोकसंख्या ३५ लाख असून ही संख्या अनेक जिल्ह्यांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येची कामे करण्यासाठी एकच तहसीलदार पुरेसा नाही. नागरिकांची कामे वेळेवर होत नाहीत. त्यामुळे आपली कामे करुन घेण्यासाठी नागरिकांना तहसीलदार कार्यालयात सतत हेलपाटे मारावे लागतात.
पूर्व भागातील गावांसाठी महसूल विभागाची तीन मंडल विभाग आहेत. वाघोली, उरुळी कांचन, थेऊर या तीन महसूल मंडलांकरिता स्वतंत्र अधिकारी व कर्मचारी वर्ग नाही. या मंडलामधील गावांची लोकसंख्या अंदाजे ६ लाखांपेक्षा जास्त आहे. या गावांमध्ये शेतकरी वर्ग जास्त आहे. तसेच ही गावे शहरालगत असल्याने दिवसेंदिवस नागरीकरण वाढत आहे. या भागातील नागरिकांच्या शासकीय कामांना अडचणी निर्माण होतात. नागरिकांच्या कामांमध्ये दिरंगाई होत असल्याने तक्रारी वाढत आहेत. पूर्व हवेली तालुक्यातील नागरिकांना पुण्यातील हवेली तहसीलदार कार्यालयात येण्याकरिता प्रचंड वाहतूक कोंडीच्या समस्येचा सामना करावा लागतो. येथे नवीन अप्पर तहसिल कार्यालय होण्या बाबतचा प्रस्ताव शासन स्तरावर गेली अनेक वर्षे प्रलंबित होता. आता शासनाची मान्यता मिळाल्याने लवकरच हे कार्यालय सुरू होईल.
– आमदार अशोक पवार