संदीप टूले :
केडगाव, (पुणे) : सध्या महाराष्ट्रातील बनावट औषधांच्या बाबतीत अन्न व औषध प्रशासन विभाग सध्या सक्रिय झाला आहे. या बनावट औषधांची पाळेमुळे शोधण्यासाठी प्रशासनाने आता कंबर कसण्यास सुरुवात केली. कारण बनावट औषधांचे जाळे हे शहरापुरते मर्यादित न राहता खेडेगावापर्यंत ही पोचले आहे. याची पाळेमुळे शोधण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
यामध्ये इतर राज्यातून येणाऱ्या औषधावर अन्न व औषध प्रशासनाची करडी नजर राहावी म्हणून सर्व घाऊक व किरकोळ विक्रेत्यांना अन्न व औषध प्रशासनाने एक परिपत्रक काढले असून, कोणतेही औषध परराज्यातून खरेदी केल्यानंतर त्याचा संपूर्ण तपशील (औषध खरेदीची प्रत) अन्न व औषध प्रशासनाला मेलच्या स्वरूपात पाठवावी लागणार आहे. सदर तपशील न दिल्यास संबंधितावर कारवाई करण्याचे आदेश काढण्यात येणार आहे. या परिपत्रकाने बाहेरून बनावट औषध खरेदीदारांचे धाबे दणाणले असणार आहे.
केमिस्टचालकांनो, मेडिकलवरील सवलतीचे बोर्ड हटवा..
अन्न व औषध प्रशासन सध्या भरमसाट सवलती देणाऱ्या मेडीकलवरील बोर्ड हटवण्याची मोहीम चालू केली आहे. कारण प्रशासनाचे म्हणणे आहे की, स्पर्धेत टिकून राहण्यासाठी केमिस्ट मेडीकलच्या दर्शनी भागात सवलतीच्या बोर्डमुळे बनावट औषधांची विक्रीला भविष्यात बळ मिळू शकते. या सवलत बोर्डच्या नावाखाली ग्राहकाची फसवणूक होत आहे. याने फार्मसी काऊन्सिल अॅक्टचे उलघन होत आहे. तसेच हे गैरप्रकार थांबण्यासाठी ही मोहीम चालू केली आहे.
या परिपत्रकामुळे बनावट औषधांच्या बाबतीत घडणारे गैरप्रकार थांबणार आहे व काही केमिस्ट फक्त सवलतीचे बोर्ड लावतात. पण तशी सवलत देत नाही. याने ग्राहकांची फसवणूक होत आहे. याने नागरिकांची होणारी फसवणूक थांबण्यास मदत होणार आहे.
-दिनेश खिवंसरा, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, पुणे