Pune News : पुणे : शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून ‘एक राज्य एक गणवेश’ धोरण राबवले जाणार आहे. विद्यार्थ्यांना समान रंगाचे दोन गणवेश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत देण्यात येणार आहेत. सरकारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो. हे गणवेश त्या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहेत. शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.
शासन निर्णय प्रसिद्ध
‘एक राज्य एक गणवेश’ धोरण राबवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने चालू शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला घेतला होता. मात्र, शाळा सुरू होण्यास काहीच दिवस बाकी असताना घेतलेल्या निर्णयामुळे शाळा, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर आता एक राज्य एक गणवेश धोरणाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. (Pune News) शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार, शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील सर्व मुली, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील मुले, दारिद्र्यरेषेखालील पालकांच्या मुलांना मोफत गणवेश देण्यात येतो. राज्यातील पात्र सर्व विद्यार्थ्यांना एक रंग, एक दर्जा असलेला समान गणवेश देण्याच्या दृष्टीने कापड खरेदीसाठी ई-निविदा प्रक्रिया राबवण्यासह तांत्रिक कार्यवाही महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत करण्यात येणार आहे.
गणवेश स्काउट आणि गाईड विषयास अनुरूप असावा. मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची पँट किंवा हाफ पँट, मुलींना आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाचा स्कर्ट किंवा गडद निळ्या रंगाची सलवार, आकाशी रंगाची कमीज असे गणवेशाचे स्वरूप आहे. एका गणवेशाला विद्यार्थ्यांच्या शर्टवरती शोल्डर स्ट्रिप आणि दोन खिसे असणे आवश्यक आहे. गणवेश शिलाईचे काम स्थानिक महिला बचत गटामार्फत करण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाकडून सहकार्य घेण्याची कार्यवाही महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने करावी, असे नमूद करण्यात आले आहे.
‘वन नेशन वन स्टुडन्ट आयडी’च्या निर्णयानंतर, आता एक राज्य एक गणवेश धोरणाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. सर्व पात्र विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश देण्यात येणार आहे. (Pune News) मोफत गणवेश योजनेबाबत शाळा, शाळा व्यवस्थापन समितीमार्फत स्थानिक स्तरावर कोणती कार्यवाही करण्यात येऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : ललित पाटीलच्या दोन मैत्रिणींना नाशिकमधून अटक; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होणार?
Pune News : मेसेज पाठवल्याच्या वादातून तरुणावर शस्त्राने वार करुन खून; चौघांना अटक