पुणे : गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणूकीची सांगता शुक्रवारी (ता. ०९) होत असताना ध्वनी प्रदुषणाची कोणाकडून तक्रार आली तर गुन्हे दाखल करणार असल्याचे प्रतिपादन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केले आहे. यंदा मिरवणूकीत डीजे दणदणाट अन् ढोल-ताशांचा कडकडाटच पुणेकरांना पाहिला मिळणार आहे. न्यायालयाच्या नियमांचे पालन करावे. असे आवाहनही गुप्ता यांनी केले आहे.
शुक्रवारी (ता. ०९) सकाळपासून शहरात बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. विसर्जन मिरवणुकीची सांगता होईपर्यंत शहर तसेच उपनगरात पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. राज्य राखीव पोलीस दलाचे (एसआरपीएफ), गृहरक्षक दलाचे जवान बंदोबस्तास राहणार आहेत. विसर्जन मार्गावरील दागिने, मोबाइल संच हिसकावणे तसेच छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलीस गस्त घालणार आहेत. नागरिकांसाठी मदत केंद्र राहणार आहे. चौकाचौकात निरीक्षण मनोरे उभे करण्यात येणार आहेत. तसेच विसर्जन मिरवणुकीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
शहराच्या मध्यभागातील प्रमुख रस्ते तसेच उपरस्ते वाहतुकीस बंदठेवण्यात येणार आहेत. आपत्कालिन परिस्थितीत रुग्णवाहिका,अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहचण्यासाठी त्वरीत मार्ग उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. नागरिकांना त्वरीत वैद्यकीय मदत उपलब्ध करुन देण्यासाठी रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. विसर्जन मिरवणुकीत संशयित व्यक्ती किंवा बेवारस वस्तू आढळल्यास त्वरीत पोलीस नियंत्रण कक्षात किंवा बंदोबस्तावरील पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे.