वॉशिंग्टन: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले की, हमासचा नाश झाला पाहिजे, परंतु पॅलेस्टिनी राज्यासाठी एक मार्ग देखील असावा. इस्रायलने गाझा पुन्हा ताब्यात घेणे ही मोठी चूक ठरेल, असा इशारा त्यांनी दिला.
इस्रायली सैन्याने गाझा सीमेवर रणगाडे तैनात केले आहेत आणि अतिरेकी गटाचा खात्मा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले. इस्रायलच्या जोरदार हवाई हल्ल्यांमुळे संपूर्ण गाझा पट्टी उद्ध्वस्त झाली आहे.
पॅलेस्टिनी प्राधिकरणाचे प्रमुख महमूद अब्बास यांची भेट :
हमासविरुद्ध सुरू असलेल्या युद्धात अमेरिका सुरुवातीपासून इस्रायलला पाठिंबा देत आहे. याआधी अमेरिकेने इस्रायलला पाठिंबा दर्शवण्यासाठी आपल्या दोन युद्धनौका इस्रायलच्या सागरी सीमेजवळ पाठवल्या आहेत. अनेक लढाऊ विमाने पाठवण्याची योजनाही आखण्यात आली आहे. मात्र, आता राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इस्रायलने गाझा ताब्यात न घेण्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे ते मध्यपूर्वेतील देशांच्या हितासाठी हे करत आहेत का, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात.
अमेरिकेचे व्हाईट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी अमेरिकन टीव्ही चॅनल सीबीएसला सांगितले की, हा संघर्ष वाढल्याने आणि उत्तरेत दुसरी आघाडी उघडल्यामुळे इराणच्या युद्धात सामील होण्याचा धोका आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी शुक्रवारी (१३ ऑक्टोबर) पॅलेस्टिनी अथॉरिटीचे प्रमुख महमूद अब्बास यांची अम्मान, जॉर्डन येथे भेट घेतली.
दरम्यान माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पॅलेस्टिनी रेड क्रिसेंटने सांगितले की, अल-कुद्स हॉस्पिटलजवळ पाच हवाई हल्ले करण्यात आले. इस्रायलने रुग्णालय रिकामे करण्यासाठी शनिवारी दुपार पर्यंतची मुदत दिली होती, जी रेड क्रेसेंटने नाकारली. तसेच या आदेशाचे पालन करणे अशक्य आहे, असे सांगितले. गाझा आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, लढाई सुरू झाल्यापासून 2,670 पॅलेस्टिनी मारले गेले आहेत आणि 9,600 जखमी झाले आहेत. हे प्रमाण 2014 च्या गाझा युद्धापेक्षा जास्त आहे, जे सहा आठवड्यांहून अधिक काळ चालले होते. हे दोन्ही बाजूंसाठी पाच गाझा युद्धांपैकी सर्वात घातक ठरत आहे.
हमासच्या 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यात 1,400 हून अधिक इस्रायली मारले गेले, ज्यापैकी बहुतेक नागरिक होते. इस्रायलच्या म्हणण्यानुसार, लहान मुलांसह इतर किमान 155 लोकांना हमासने पकडून गाझाला नेले आहे. 1973 मध्ये इजिप्त आणि सीरियासोबत झालेल्या संघर्षानंतर इस्रायलसाठी हे सर्वात घातक युद्ध आहे.