नाशिक : छगन भुजबळ आमचे दैवत असून त्यांना धमकी देणं हे चूक आहे. जर असं काही होत असल्यास बाकीचा समाजदेखील गप्प बसणार नाही. माझं सर्वांना आवाहन आहे की, कोणीही अशा धमकी देऊ नका, ते अजिबात योग्य नाही. मंत्री छगन भुजबळांच्या भानगडीत पडू नका नाहीतर आम्हाला विचार करावा लागेल, असा इशारा रासपचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी दिला आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर शनिवारी नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी जाणकर बोलत होते. यावेळी त्यांनी छगन भुजबळांना आलेल्या धमकीचा तीव्र निषेध करत संबंधितांना सज्जड दमच दिला आहे. छगन भुजबळ यांच्या मागे लागू नका, नाहीतर आम्हाला विचार करावा लागेल, असा सूचक इशारा जानकर यांनी दिला आहे.
माजी मंत्री महादेव जानकर यावेळी म्हणाले की, मराठ्यांना, धनगरांना, आदिवासींना आरक्षण मिळाले पाहिजे, ही माझ्यासह सर्वांची भूमिका आहे. मात्र, याआधी काँग्रेसने खेळवत ठेवलं, आता भारतीय जनता पक्षही तेच करतं आहे. भाजपही काँग्रेससारखे वागू लागली आहे. आरक्षणासंदर्भातील विधेयक लोकसभेत पास केले पाहिजे. यामध्ये ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या, अशी मागणीही जानकर यांनी केली.