गणेश सुळ
केडगाव, ता.०४: दौंड शहरात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे काही भागात रस्त्यावर फिरणेही कठीण झाले आहे. रात्री रस्त्यावर कुत्र्यांची घोळके बसलेले असतात. ते वाहनधारकांच्या अगावर धावून जातात. भटक्या कुत्र्यांनी काही नागरिकांना चावा घेतला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. तर संपूर्ण शहरात हजारांहूनअधिक कुत्री असल्याचा नागरिकांनी अंदाज वटविला आहे.
दौंड शहरातील भीमनगर येथील गवळी कुटुंबियांच्या दोन दिवसापूर्वी जन्मलेल्या म्हशीच्या पिल्लाला कुत्र्यांनी फस्त केले. तर गोपळवडी परिसरात मुख्याध्यापक रस्त्याने चालत असताना काही कुत्र्यांनी चावा घेण्यासाठी त्यांच्या अंगावर धाव घेतली. यातूनत्यांनी बचावाचा प्रयत्न केला असता ते रस्त्यावर पडले. यामध्ये त्यांना गंभीर मार लागला. त्यामुळे नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने त्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
कंपनीतून रात्रीच्या वेळी घरी येणारे कामगार, पहाटे फिरायला, व्यायामाला जाणार्या नागरिकांवर ही कुत्री धावतात व चावा घेण्याचा प्रयत्न करतात. अनेक दुचाकीस्वारांना या कुत्र्यांना चुकविताना अपघात झाला आहे. हा प्रश्न गंभीर असल्याने या घटनेसंदर्भात नगरपरिषदेकडून लवकरात लवकर उपाययोजना आखणे गरजेचे आहे.
दरम्यान, दौंड येथील उपजिल्हा रुग्णालयात या मोकाट कुत्री चावल्यानंतर जवळपास ३०० हून अधिक नागरिक लासिकरणासाठी येतात .तर काही नागरिक खाजगी रुग्णालयात उपचार घेतात. त्यासाठी दौंड नगरपालिका या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन या मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करावा. अशी मागणी आता दौंडमधील नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
या मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त साठी दौंड नगरपालिकेच्या वतीने माहेरा इंटरप्रायजेस यांना नऊ महिन्यांपूर्वी काम दिले आहे. त्यांनी आत्तापर्यंत २०० हून अधिक कुत्री पकडुन, त्यांना निर्जन स्थळी सुरक्षित सोडण्यात आले आहे. आणखी अशी मोकाट कुत्री अथवा चावा घेणारी कुत्री कोणाला आढळली तर तेथील परिसराची माहिती दौंड नगरपालिकेला संपर्क साधून द्यावी.
संतोष टेंगले – मुख्याधिकारी दौंड नगरपालिका