पुणे प्राईम न्यूज: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीसंदर्भात येत्या 6 ऑक्टोबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सुनावणी होणार आहे. ही सुनावणी होण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट आणि आयोगात चांगलीच जुंपली आहे. शरद पवार गटाने या प्रकरणी निवडणूक आयोगावर थेट एकांगी निर्णय घेतल्याचा आरोप केला आहे. विधिमंडळ पक्ष आणि मूळ पक्ष वेगळा आहे. तर, मग निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्याचे मान्य केलेच कसे? असा नेमका आणि कळीचा प्रश्न राष्ट्रवादीने आयोगापुढे उपस्थित केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ या निवडणूक चिन्हावर दावा सांगितला आहे. त्यांनी या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर निवडणूक आयोगापुढे 6 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. या सुनावणीत दोन्हीही गट आपापली बाजू मांडणार आहेत. ही सुनावणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात 2 गट पडल्याचे ग्रहित धरून होणार आहे. दरम्यान शरद पवार गटाने आपल्या वकिलांमार्फत सादर केलेल्या उत्तरात आयोगावर पक्षपातीपणा केल्याचा आरोप केला आहे.
विधिमंडळ पक्ष व मूळ पक्ष वेगळा असतानाही केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट असल्याचे मान्य केलेच कसे? असा महत्त्वपूर्ण प्रश्न शरद पवार गटाने या प्रकरणी आयोगाला केला आहे. खासदार शरद पवार गटाने आयोगावर आपली बाजू स्पष्ट करण्यासाठी वेळ दिला नसल्याचाही आरोप देखील केला आहे. आयोगाने सर्वप्रथम आमचे म्हणणे ऐकून घ्यावे. त्यानंतर आपला निर्णय द्यावा, अशी मागणी शरद पवार गटाने केली आहे. आता निवडणूक आयोग यावर कोणता निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.