ड्रग्स रॅकेटचा सूत्रधार ललित पाटील ससून रूग्णालयातून फरार; बंदोबस्तावरील पोलिसांना गुंगारा
Breaking News : पुणे : येवरडा कारागृहातील कैदी ललित पाटील विविध आजारांमुळे जूनपासून ससून रुग्णालयात दाखल झाला होता. तो रुग्णालयात राहून ड्रग्स रॅकेट चालवत असल्याचा प्रकार पुणे पोलिसांनी दोन दिवसांपूर्वीच उघड केला होता. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच गुन्ह्यातील प्रमुख आरोपी असलेला ड्रग्स रॅकेटचा सूत्रधार ललित पाटील हा सोमवारी रात्री ससून रुग्णालयातून पसार झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. यामुळे पोलिसांच्या रुग्णालयातील बंदोबस्तावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
पोलिसांच्या रुग्णालयातील बंदोबस्तावर प्रश्नचिन्ह
ससून रुग्णालयातून कैद्याकडून ड्रग्स रॅकेट चालण्याचा खळबळजनक प्रकार नुकताच उघड झाला होता. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच १ किलो ७५ ग्रॅमचे मेफिड्रोन ड्रग्स जप्त केले होते. त्या ड्रग्सची किंमत सुमारे दोन कोटी रुपये होती. (Breaking News) या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच आरोपी पाटील पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी ललित पाटील याच्यासह सुभाष जानकी मंडल (वय २९, रा. देहूरोड, मूळ झारखंड ) आणि रौफ रहिम शेख (वय १९, रा. ताडीवाला रस्ता) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Breaking News) पाटील याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू असल्याने त्याला रुग्णालयातून सोडल्यानंतर अटक करण्यात येणार होती. मात्र, सोमवारी रात्री दहाच्या सुमारास ससून रुग्णालयातील वाॅर्ड क्रमांक १६ मधून ललित पाटील बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्यांना गुंगारा देऊन पसार झाला. घटनेची माहिती मिळताच चत्काळ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
ललित पाटील याने छातीत दुखत असल्याचे कारण सांगितले. त्यानंतर त्याचा एक्स रे काढण्यासाठी त्याला दुसऱ्या रुममध्ये नेले जात होते. त्यावेळी पोलिसांना हिसका देऊन तो रेल्वे स्थानकाच्या दिशेने पसार झाला. घटनेची माहिती मिळताच बंड गार्डन पोलीस आणि गुन्हे शाखेकडून तपास सुरु करण्यात आला. (Breaking News) तसेच या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला.
पाटील याला चाकण परिसरात मेफेड्रोन बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो येरवडा कारागृहात होता. आजारी असल्याचे सांगून जून २०२३ मध्ये तो ससून रुग्णालयातील वाॅर्ड क्रमांक १६ मध्ये उपचारासाठी दाखल झाला होता. (Breaking News) पाटील स्वत: मेफेड्रोन तयार करत असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली होती. या प्रकरणात मंडल आणि शेख यांना अटक करण्यात आल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
दरम्यान, पाटीलने अमली पदार्थाची कोणाला विक्री केली आहे का? सुभाष मंडल आणि रौफ शेख यांनी मेफेड्रोन व्यतिरिक्त अन्य कोणत्या अमली पदार्थांचा साठा करून ठेवला आहे का? आरोपी शेख गेल्या ६ वर्षांपासून ससून रुग्णालयातील उपाहारगृहात कामाला आहे. (Breaking News) त्याने पाटीलच्या मदतीने अमली पदार्थांची विक्री केली का? तसेच, ससून रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पाटीलने आणखी काही गैरप्रकार केले का, यादृष्टीने तपास करायचा असल्याने आरोपींना पोलीस कोठडी देण्याची विनंती पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती. ललित पाटील याच्या चौकशीतून महत्वाची माहिती मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. परंतु तो फरार झाल्यामुळे पोलिसांनाही धक्का बसला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Big Breaking News : पुणे-सोलापूर मार्गावर धावणार १० ‘ई-शिवाई’ ; प्रवाशांना दिलासा