महाळुंगे, (पुणे) : पक्षाचे निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचा विचार, पुढील ध्येय धोरण, केलेली कामे व राबविलेल्या योजना तळागाळातील जनतेला सांगाव्यात. कोणत्याही पक्षाचा नाही त्या व्यक्तीला पक्षाशी जोडणे महत्वाचे काम कार्यकर्त्यांनी करावे. भविष्यातील निवडणुका जिंकण्यासाठी भाजपा पक्षाचे कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी केले.
खेड तालुका भारतीय जनता पार्टी पदाधिकारी पदग्रहण सोहळा कार्यक्रम संतोषनगर भाम येथील साईकृपा कार्यालयात (दि. ३०) रोजी संपन्न झाला. तालुकाध्यक्ष शांताराम भोसले यांनी तालुका कार्यकारिणी जाहीर करून कार्यकर्त्यांना पदाचे नियुक्तीपत्र वाटप प्रसंगी मार्गदर्शन करताना बुट्टे पाटील बोलत होते.
यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य राम गावडे, समन्वयक चंद्रशेखर शेटे, धर्मेंद्र खांडरे, महिला जिल्हाध्यक्ष पूनम चौधरी, निवडणूक प्रमुख अतुल देशमुख, तालुकाध्यक्ष शांताराम भोसले, माजी सभापती व महिला तालुकाध्यक्ष कल्पना गवारी, बाजार समिती संचालक क्रांती सोमवंशी, गणेश सांडभोर, संजय रौधळ, काळुराम पिंजन, शिवाकाली खेंगले. कालिदास वाडेकर, सुनील देवकर, रोहित डावरे पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना बुट्टे पाटील म्हणाले, तालुक्यात पक्षाच्या माध्यमातून सातत्याने मोठ्या निवडणुका लढविल्या गेल्या नाहीत. त्यामुळे भाजपा पक्ष खेड तालुक्यात प्रस्थापित नाही परंतु यापुढे सर्व निवडणुका जिंकायच्या असून पक्षाचे कार्यकर्ते सत्तेत गेले पाहिजेत. पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांची कामे झाली पाहिजेत. लोकांच्या कामासाठी अधिकाऱ्यांशी संघर्ष करावा लागणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना भोसले म्हणाले, मी पक्षासाठी दिवसरात्र काम करतोय. सरल अँप संख्या वाढवून बूथ रचना केली पाहिजे. पक्षाचे कार्यकर्त्यांनी देखील इनामे इतबारे प्रामाणिक काम करावे. चांगले काम करणाऱ्या कार्यकर्त्याला पक्षाचे चांगले पद दिले जाईल. पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारिणीकडून आलेला प्रोग्राम आम्ही दररोज राबवून सातत्याने रिपोर्ट करावा लागत असल्याचे सांगून तालुक्यातील अधिकारी वर्ग सांगून ऐकत नाहीत. याबाबतची खदखद भोसले यांनी भाषणात व्यक्त केली.