युनुस तांबोळी
शिरूर, (पुणे) : भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याने उसाला दिलेला भाव भाव मान्य नसल्याचे सांगत सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी करत पोस्टर जाळण्याची घटना पिंपरखेड (ता. शिरूर) येथे घडली होती. या प्रकरणी ९ जणांविरोधात शिरूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हाध्यक्ष प्रभाकर गोपाळा बांगर, वनाजी बजरंग बांगर (रा. दोघेहि मंचर ता. आंबेगाव) माऊली ढोमे, सतिष बोंबे, बन्सी पोखरकर, नरेश सोनवणे, शांताराम वरे, तुळशीराम ढोमे, मुरलीधर बोंबे (रा. सर्वजण पिंपरखेड ता. शिरूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ९ जणांची नावे आहेत. याप्रकरणी शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस शिपाई विशाल पालवे यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारगाव दत्तात्रेय नगर (ता. आंबेगाव) येथे भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याची २७ वी वार्षीक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. यावेळी वळसे पाटील यांनी या वर्षीच्या उसाला अंतीम दर ३१०० रूपये जाहिर केला. पण हा दर ३३०० ते ३४०० रूपये प्रतीटन मिळावा. या मागणीसाठी शेतकरी संघटनेने उपोषण केले होते.
भाग विकास निधीच्या नावाखाली अंतीम हप्त्यामधून ५० रूपयांची केलेली कपात ही शेतकऱ्याच्या कष्टाच्या घामाच्या पैशावर डल्ला मारला जातोय. वळसे पाटील यांनी या आंदोलकाची खिल्ली उडवून अन्याय केला आहे. असे सांगत आम्ही गावागावात जाऊन त्यांच्या सभा उधळून लावू. असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पुणे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी दिला होता.
दरम्यान, प्रशासनाची परवानगी न घेता जमाव करून सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच त्यांच्या फोटोचे पोस्टर जाळले. त्या नूसार नऊ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील उगले करत आहेत.