युनूस तांबोळी
Shirur News : शिरूर : दमट वातावरण, ढगांनी केलेली गर्दी यातून गुरूवार (ता. 28) दुपारपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसाचा चांगलाच जोर असल्याने शेतांमध्ये पाणी साचले होते. ओढे-नाल्यांना पूर आला असून, तलाव पाण्याने भरू लागल्याने शिरूर तालुक्यातील पश्चिम भागात समाधानाचे वातावरण आहे. मात्र, अजूनही पाऊस सुरू राहिला तर मोठ्या प्रमाणात बाजरीच्या पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
यावर्षी जून महिन्यात पाऊस न झाल्याने खरीप हंगामाच्या पेरण्या रखडल्या. मात्र, थोडी फार ओल व पाण्याचे व्यवस्थापन करून शेतकऱ्यांनी 57 टक्के बाजरीची पेरणी केली. जुलै महिन्यात देखील पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी हवालदिल झाला. या काळात अनेक ठिकाणी बाजरीचे पीक सुकू लागले. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात तुरळक स्वरूपात पावसाने हजेरी लावली. त्यावरच बाजरीचे पिक शेतावर डोकावू लागले. कडधान्याची पेरणी न झाल्याने यावर्षी कुठेही कडधान्य दिसून येत नाही.
बळीराजा सुखावला
श्री गणेश स्थापनेपासून परतीचा पाऊस झाला सक्रीय असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे थोड्या फार प्रमाणात पुन्हा पावसाने हजेरी लावल्याचे दिसून येत आहे. (Shirur News) मंगळवारी, बुधवारी रात्रीच्या वेळी पावसाने चांगलीच हजेरी लावल्याचे दिसून येत आहे. गुरूवारी (ता. 28) दुपारी कवठे येमाई, सविंदणे परिसरात मुसळदार पाऊस झाला आहे. या पावसाने ओढे, नाले, बंधारे तुडुंब भरले आहेत. तर काही परिसरात या पावसाने मोठे नुकसान केले आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले. त्यामुळे रस्त्याकडेला पाणीच पाणी दिसून येत होते. शेतात देखील या पाण्यामुळे तळ साचल्याचे दिसून येत होते.
कवठे येमाई येथील ‘दत्ताचा ओढा’चाही फुल्ल !
कवठे येमाई येथील दत्ताचा ओढा म्हणून ओळख असलेला ओढा तुटूंब भरून वाहू लागला. त्या पाठोपाठ लेंडी नाला देखील पाण्याने वाहू लागला होता. (Shirur News) सविंदणे व कवठे येमाई या सरदद्दीवर मुसळधार पाऊस झाल्याने शेतात तळे साचल्याचे दिसून येत होते. या ठिकाणी रस्त्याच्या कडेला खचल्याचा प्रकार घडला आहे. ऊसाच्या शेतात पाणी साचून ऊस पडल्याचे दिसून येत आहे.
पावसाने शेतकरी सुखावला
विद्युत खांब पडल्याने वीज पुरवठा विस्कळीत झाला होता. मात्र, काही काळातच वीज पुरवठा पूर्ववत सुरू करण्यात महावितरणला यश आले.(Shirur News) या पावसाने नुकसान केले असले तरी जोरदार पावसाने शेतकरी सुखावल्याचे चित्र आहे. मिडगुलवाडी, कान्हूर मेसाई या परिसरात पाऊस झाला असला तरी देखील खूप मोठा पाऊस या भागासाठी आवश्यक आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : खार ओढ्यात पाय घसरून पडलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर सापडला