भोर / जीवन सोनवणे : अवयवदानासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती होणे व एक चळवळ उभी करणे आज काळाची गरज आहे. देशभरात हजारो नागरिकांचे प्राण वाचतील. देशाचा आरोग्य आलेख उंचावेल, यासाठी अवयवदान ही काळाची गरज आहे, असे शुभांगद गोरेगावकर स्मृती हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. सुरेश गोरेगावकर यांनी सांगितले.
जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त अवयवदानाबाबत जनजागृती कार्यक्रम नवसह्याद्री शिक्षण संस्थेचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय नसरापूर यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात डॉ. गोरेगावकर बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते. डॉ. गोरेगावकर म्हणाले, ‘आपल्या भागातील असंख्य नागरिकांनी अवयवदान केले असून, अनेकांना नवजीवन मिळाले आहे. अशाप्रकारे अवयवदानासाठी पुढे येणे काळाची गरज आहे’.
यावेळी अवयवदान कधी करू शकता? केव्हा करू शकता? कोण करू शकते? अवयवदान प्रक्रिया कशी आहे? याबद्दलची संपूर्ण माहिती क्षेत्रीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राच्या कनिष्ठ मध्यवर्ती समन्वयक संगीता जाधव यांनी दिली.
दरवर्षी 25 सप्टेंबर रोजी जागतिक फार्मासिस्ट दिन साजरा केला जातो. नवसह्याद्री शिक्षण संस्थेच्या औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या वतीने डी. फार्मसी आणि बी. फार्मसीच्या एकूण 150 विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढली. चेलाडी फाटा ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नसरापूरपर्यंत रॅली काढण्यात आली. रॅलीनंतर नवसह्याद्री औषनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या सभागृहात फार्मासिस्ट दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला.
यावेळी नवसह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पोपटराव सुके, प्राचार्य डॉ. किशोर ओतारी, विभागप्रमुख डॉ. रूपांजली गायकवाड, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मॉडेल, पोस्टर मेकिंग अशा विविध स्पर्धांचेही आयोजन देखील करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.