Pune News : पुणे : आर्मीच्या सिकंदराबाद येथील युनिटमध्ये भरती करतो असे सांगून, आर्थिक फसवणूक करणाऱ्या तोतया लष्करी अधिकाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मिलिटरी इंटेलिजन्स आणि वानवडी पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. रणजीत कुमार राजेंद्र सिंग (रा. कोईमत्तूर, तामिळनाडू) असे अटक आरोपीचे नाव आहे. वानवडी येथील रेस कोर्स परिसरात हा प्रकार घडला.
याप्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आरोपीने आर्मी इंटेलिजन्सच्या रेकॉर्ड ऑफिसमध्ये काम करीत असल्याची बतावणी केली. आर्मीमध्ये नोकरी लावून देतो, म्हणून बनावट अपॉईंटमेंट लेटर देऊन, चौघांना तब्बल १२ लाख ८० हजार रुपयांना फसविले. (Pune News) याप्रकरणी धोंडीबा राघू मोटे (वय २१, रा. मोटेवडी, जत, सांगली) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, पोलिसांनी आरोपीकडून आर्मीचे बनावट ओळखपत्र व अन्य बनावट कार्ड जप्त केली. हा प्रकार फेब्रुवारी २०२३ पासून सुरू होता.
बनावट अपॉइंटमेंट लेटर दिले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोटे आणि त्यांचे मित्र सचिन कोळेकर (रा. कंटी, सांगली), माळाप्पा पांढरे, सागर मोटे हे सर्वजण रेस कोर्स, वानवडी येथे आर्मी भरतीचा सराव करत होते. हीच संधी साधून आरोपी रणजीत कुमार राजेंद्र सिंग तेथे पोहोचला. मुलांशी गोड बोलून, त्यांचा विश्वास संपादन केला. (Pune News) आर्मी इंटेलिजन्समध्ये रेकॉर्ड ऑफिसमध्ये काम करीत असल्याची बतावणी करत, तुम्हालाही मी आर्मीत भरती करतो, असे आमिष दाखवले. एवढ्यावरच न थांबता, नोकरी लागल्याचे बनावट अपॉइंटमेंट लेटर दिले. विश्वास संपादन करून चौघाकडून वेळोवेळी एकूण १२ लाख ८० हजार रुपये रोख व ऑनलाइन स्वरूपात घेऊन आर्थिक फसवणूक केली.
संबंधित व्यक्तीने परमेश्वर महादेव घोडके (रा. जेवळी उस्मानाबाद), दत्ता चंद्रकांत म्हेत्रे (रा. देवणी, लातूर), अभिजीत सूर्यकांत तांबे (रा. मयूर पार्क, हांडेवाडी), सचिन वसंत पवार (रा. रहमतपुर, सातारा), आदित्य संजय पवार, प्रतीक प्रवीण पवार, सुरज सुनील मोरे (रा. मोरेवाडी, सातारा), चेतन हनुमंता चव्हाण (रा. आरळे, सातारा), अभय श्रीरंग नलावडे (रा. पानपेळवाडी, सातारा), गणेश क्षीरसार (रा. तुळजापूर, उस्मानाबाद), निलेश दयाप्पा नाईक (रा. धाटी, कोल्हापूर), प्रमोद दशरथ गावडे (रा. हल्लारवाडी, कोल्हापूर), तौसीफ शेख (ता तुळजापूर) यांच्याकडून देखील आर्मीमध्ये नोकरी लावण्याच्या आमिषाने पैसे उकळले आहेत.
या घटनेचा पुढील तपास उपनिरीक्षक अजय शितोळे करीत आहेत.