Loni Kalbhor News : लोणी काळभोर, ता.२५ : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हाणामारी, गुंडगिरी, चोऱ्या व घरफोडी अशा विविध गुन्ह्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. आता लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील सिद्धाराम मळा व नांदे पाटील बल्लाळे वस्ती येथे चोरट्यांनी भरदिवसा घरफोड्या केल्याची घटना रविवारी (ता.२४) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. घरफोडी करणारे चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले असले तरी ते मिळत का नाहीत अशी चर्चा सध्या सुरू आहे.
भरदिवसा घरफोड्या…
मिळालेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर येथील सिद्धाराम मळा व नांदे पाटील बल्लाळे वस्ती परिसरात दोन चोरटे दुचाकीवर फिरत होते. चोरट्यांनी पाळत ठेऊन दोन बंद घरे हेरली. रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस सुरु असतानाच चोरट्यांनी दोन बंद घरे फोडली. एका घरफोडीतून रोख रकमेसह सोन्याचे दागिने चोरी केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, एका ठिकाणी चोरट्यांना काहीही न मिळाल्याने त्यांनी घरातील सामानच अस्ताव्यस्त केले.
पोलिसांच्या नाकावर टिच्चून घरफोड्या
पोलिसांच्या नाकावर टिच्चून घरफोड्या झाल्याच्या अनेक घटना सर्वश्रुत आहेत. यामुळे शहरातील गुन्हेगारांना आता खाकीचा धाक उरला आहे की नाही, अशा चर्चा सुरू आहेत. लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत दिवसाढवळ्या घरफोड्या होत आहेत. तसेच काही छोट्या मोठ्या घटना या कायम सुरु असून, लोणी काळभोर पोलीस मात्र काहीच झाले नसल्याचा आव आणीत आहेत.
खबऱ्यांचे नेटवर्क संपले का?; नागरिकांचा संतप्त सवाल
मागील काही दिवसांपासून लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भुरट्या चोरट्यांचा धुमाकूळ सुरु आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. तगडी पोलिस यंत्रणा असतानाही लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अशा वाढत्या घटनांमुळे लोणी काळभोर, उरुळी कांचनसह परिसरातील नागरिक हवालदिल झाले आहेत. त्यामुळे लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे सध्या खबऱ्यांचे नेटवर्क संपले का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
अनेक घरफोड्या व चोरीच्या घटना अद्याप ‘अनडिटेक्ट’च…!
लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक दुचाकी व चारचाकी वाहने चोरीला गेले आहेत. तसेच पुणे – सोलापूर महामार्गावर मोठमोठे अपघात झाले आहेत. या अपघातात अनेकांना आपल्या जीवानिशी मुकावे लागले आहे. या अपघातात अज्ञात वाहने धडक देऊन निघून गेली. मात्र, त्या वाहनांचा व चालकांचा अजूनही थांगपत्ता मिळू शकला नाही. तसेच अनेक घरफोड्या व वाहने चोरीच्या घटना अद्याप ‘अनडिटेक्ट’च आहेत.