सोलापूर : आईचे श्राद्ध करण्यासाठी केलेल्या खर्चावरून फक्त पाचशे रुपयांसाठी मोठ्या भावाने लहान भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना सोलापुरातील पिंजारवाडी येथे घडली आहे. फक्त पाचशे रुपयांसाठी मोठ्या भावाने लहान भावाचा खून केल्यामुळे सोलापुर, पिंजारवाडीसह परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
सैफन घूडूसाब नदाफ असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर मीरालाल घुडूसाब नदाफ, सलीम मीरालाल नदाफ, रफिक मीरालाल नदाफ, नियामतबी मीरालाल नदाफ असे मारहाण करणाऱ्या चौघांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी चौघांनाही अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एक वर्षांपूर्वी मीरालाल आणि सैफन यांच्या आईचे निधन झाले होते. या दोघां भावांनी एकत्रितरित्या आईचे श्राद्ध करून गोरगरिबांना अन्नदान केले होते. यावेळी गावातील एका मशिदीत असलेल्या मंगल भांडारमधून भांडे भाड्याने घेतले होती. या मंगल भांडारचे पाचशे रुपये उधारी शिल्लक राहिली होती. ही उधारी मागण्यासाठी मशिदीचे विश्वस्त जमादार सैफन नदाफ यांच्या घरी गेले होते. पण हि रक्कम मीरालाल नदाफ यांच्या कडून घ्या असे सैफन नदाफ यांनी सांगितले होते.
त्यानुसार मीरालाल नदाफ यांनी मंगल भांडारचे पाचशे रुपये उधारी दिली पण यावरून दोघा भावांत वितुष्ट निर्माण झाले आणि वादविवाद झाला. मीरालाल नदाफ यांनी पाचशे रुपये उधारी देऊन जमादार यांना पाठविले. पाचशे रुपयांवरून मीरालाल नदाफ हा छोटा भाऊ सैफन नदाफ यावर चिडून होता. सैफन नदाफ हा शेतातील मोटार चालू करण्यासाठी गेला होता. त्यावेळी सैफन हा एकटा असल्याची संधी साधून मीरालाल नदाफ यांनी पाचशे रुपयांसाठी कर्जदारांना माझ्या घरी पाठवतो का असा जाब विचारत मारहाण करण्यास सुरुवात केली.
यावेळी मीरालाल यांचा मुलगा रफिक नदाफ याने पाठीमागून येऊन सैफन नदाफ यांचे हातपाय पकडले, मीरालाल नदाफ यांनी दगडाने, सळईने छोटा भाऊ सैफन नदाफ यांच्या डोक्यावर जबर मारहाण केली. मीरालाल नदाफ यांची पत्नी, नियामतबी नदाफ, दुसरा मुलगा सलीम नदाफ यांनी सैफन नदाफ यांच्या डोक्यावर आणि सर्वांगास जबर मारहाण केली.
दरम्यान, शहनाज नदाफ यांनी उपचारासाठी पती सैफन यांस सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले.पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यावेळी पिंजारवाडीतील ग्रामस्थांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एकच गर्दी केली होती. फक्त पाचशे रुपयांसाठी भावाने भावाला संपविले अशी चर्चा करत ग्रामस्थ हळहळ व्यक्त करत होते.