पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ऋषिपंचमीनिमित्त पहाटे ३१ हजार महिलांनी उत्सव मंडपासमोर अथर्वशीर्ष पठण केले. अथर्वशीर्ष पठण उपक्रमाचे यंदा ३५ वे वर्ष होते. गणेश नामाचा जयघोष करीत महिलांनी पहाटेच्या मंगल समयी प्रसन्नतेची अनुभूती दिली. कोरोनाच्या संकटानंतर दोन वर्षांनंतर यंदाच्या गणेशोत्सवात हा सोहळा गणेशभक्तांनी अनुभविला.
प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल, पोलीस उपायुक्त डॉ. प्रियांका नारनवरे, ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतिश रासने, मंगेश सूर्यवंशी, बाळासाहेब सातपुते, माऊली रासने, उपक्रम प्रमुख शुभांगी भालेराव, अर्चना भालेराव यावेळी उपस्थित होते.
जगद्गुरू शंकराचार्य रचित सौंदर्य लहरी चे पठण मी केले आहे. धर्म बळकट करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे हे पठण आपण सर्वानी एकत्रितपणे नक्की करूया, असे पौडवाल यांनी सांगितले.
“प्रत्येक घरामध्ये असलेल्या स्त्री शक्ती मुळे चांगले संस्कार घडत आहेत. दगडूशेठ गणपती ट्रस्ट उत्तम कार्य करीत असून यामुळे इतरांना समाजासाठी काम करण्याची प्रेरणा नक्कीच मिळेल,” अशी अपेक्षा डॉ. प्रियांका नारनवरे यांनी यावेळी व्यक्त केली.
महिलांनी शंखनाद केल्यानंतर ॐकार जप आणि मुख्य अथर्वशीर्ष पठण करीत गणरायाला नमन केले. हात उंचावून टाळ्यांचा गजर करीत महिलांनी गणरायाला अभिवादन केले. ट्रस्टच्या जय गणेश पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यानी स्वातंत्र्य सेनानींच्या माहितीचे फलक हातात घेऊन त्यांना अभिवादन केले. उत्सव मंडपापासून ते हुतात्मा चौकापर्यंतचा परिसर महिलांच्या गर्दीने भरला होता.