लोणी काळभोर, (पुणे) : फडणवीस सरकारने आरक्षण देतो म्हणून धनगर समाजाची फसवणूक केली आहे. तसेच धनगर समाजातील नेत्यांनीही समाजाची दिशाभूल केली असून, आज रस्त्यावर मेंढ्या सोडल्यात पुढील काळात न सांगता मंत्रालयात मेंढ्या सोडल्या जातील, असा इशारा धनगर समाज युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष घनश्याम हाके यांनी दिला.
धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी आता धनगर समाजाने रस्त्यावरची लढाई सुरू केली आहे. चौंडी येथे आमरण उपोषणास बसलेल्या धनगर बांधवांना पाठींबा देण्यासाठी सकल धनगर समाजाच्या वतीने कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाक्यावर शनिवारी (ता. १६) रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. यावेळी हाके बोलत होते.
धनगर समाजाच्या आरक्षणाचा अंमलबजावणी करत धनगरांच्या विविध मागण्या सरकारने पूर्ण कराव्यात, अशा मुख्य मागणीसाठी धनगर समाजाने रास्ता रोको केला. या आंदोलनामुळे पुणे बाजूकडे जाणारी वाहतूक तब्बल अर्धा ते पाऊन तास खोळंबली होती. रस्ता रोको आंदोलनात महिलांसह पुरुष युवक वर्ग मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.
यावेळी छावा संघटनेचे पैलवान आप्पासाहेब आखाडे, साधना सहकारी बँकेचे संचालक बाळासाहेब कोळपे, माजी पंचायत समिती सदस्य मल्हारी कोळपे, विनोद राहिंज, एकनाथ पांढरे, बारामती पंचायत समितीचे सदस्य राहुल दादा झारगड, धनगर समाज सेवा संस्थेचे दत्तात्रय चोरमले, संतोष देवकाते, गजानन वाघमोडे, महेंद्र कांबळे, जयराम केसकर, हेमंत कोळपे, विनोद राहिंज, राजेंद्र पिंगळे, संजय काळे, विजय कोळपे, नामदेव केसकर, संतोष पिंगळे, तात्या कारंडे, दत्ता धायगुडे, संपत कोळपे, दादासाहेब केसकर, विश्वराज वाघमोडे, अनेक समाज बांधव उपस्थित होते.
विविध घोषणांनी परिसर गेला दणाणून..
‘यळकोट यळकोट जय मल्हार’ ‘मल्हारराव होळकरांचा विजय असो’‘राजमाता अहिल्या देवी होळकरांचा विजय असो’ ‘आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या आंदोलनात लोणी काळभोर, हडपसर, थेऊर, पुणे, करमाळा तालुका येथील धनगर समाज बांधव रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाले होते.
दरम्यान, राज्यात मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक असताना चौंडी येथील धनगर बांधवांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून आता धनगर समाज आक्रमक झाला आहे. सदर मागण्यांचे मागण्याचे निवेदन एसीपी अश्विनी राख यांनी देण्यात आले. यावेळी आंदोलनाच्या ठिकाणी लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या वतीने मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
आरक्षणासाठी धनगर समाज शेळ्या-मेंढय़ांसह पुणे-सोलापूर महामार्गावर..
पुणे – सोलापूर महामार्गावरील पुण्याच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्यावर समाजबांधवांनी रास्तारोको करुन सरकारचा निषेध केला. शेळ्या-मेंढ्यांसह पिवळे झेंडे घेऊन समाजबांधव आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर मेंढ्या सोडल्याने पुण्याकडे जाणारी वाहतूक खोळंबली होती.