लहू चव्हाण
पाचगणी : रेशन धान्य वितरण व्यवस्थेत वापरण्यात येत असलेल्या ई पॉस मशिनचा सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्याने लोकांना धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. पाचगणी येथील रेशनवर धान्य उपलब्ध आहे. मात्र, सर्व्हर डाऊन व शेतीमध्ये काम करणाऱ्या नागरिकांचे फिगंर प्रिंट मॅच होत नसल्याने वेळेवर मिळत नाही. यामुळे गोरगरीब लोकांना धान्य वेळेत मिळत नसल्याने लोक हैराण झाले आहेत. त्यामुळे मशीन पद्धत बंद करण्याची मागणी नागरिक करु लागले आहेत.
गरीब कुटुंबांना पुरेसे अन्न मिळावे, त्यांची उपासमार होऊ नये यासाठी शासनाने स्वस्त धान्य दुकानामार्फत होणाऱ्या रेशन धान्य वितरण व्यवस्थेत पारदर्शकता यावी, या हेतूने राज्यभरात ई-पॉस या बायोमेट्रिक प्रणालीचा वापर सुरू झाला आहे. परंतु ई-पॉस मशिनचा सर्व्हर वारंवार डाऊन होत आहे. अशा गरीब व सर्वसामान्य कुटुंबासाठी स्वस्त दरात रेशन उपलब्ध करून देण्याची योजना अंमलात आणली. परंतु ई-पॉस मशीनचे सर्व्हर वारंवार डाऊन होत आहे. तसेच स्लो नेटवर्कमुळे लिंक फेल होऊन रेशन वितरणात वारंवार अडचणी येत आहेत. परिणामी लाभार्थ्यांसह स्वस्त धान्य दुकानदारही त्रस्त झाले आहेत.
ई-पॉस मशीनमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे रोजंदारीवर जाणाऱ्या नागरिकांना कामाचे खाडे करून गेली तीन ते चार दिवसांपासून संपूर्ण दिवस रेशन दुकानासमोर घालवावा लागत असल्याने दोन्ही बाजूने उपाशी मरण्याची वेळी आली आहे. रेशन दुकानदाराला दिवसभरात एक ते दोन ग्राहक करण्यासाठी एक ते दीड तासाचा वेळ लागत आहे. परिणामी दुकानासमोर लाभार्थ्यांची गर्दी होत असते. दुकानात धान्य साठा शिल्लक असूनसुद्धा मशीनवर धान्य उपलब्ध होत नसल्यामुळे धान्य देता येत नाही. या प्रकारामुळे अनेक लाभार्थी हवालदिल झाले आहेत.
दरम्यान, अनेकदा उद्भवणाऱ्या तांत्रिक दोषामुळे लाभार्थ्यांना धान्य वितरणात अडचणी येत असून बऱ्याच ठिकाणी रेशन दुकानदार व लाभार्थ्यांमध्ये किरकोळ वाद होत आहेत. प्रसंगी नागरिक धान्य दुकानदार यांच्याच्यावर ताशेरे ओढून शिवीगाळ करू लागले आहेत. यामुळे धान्य दुकानांदाराना परिस्थिती हाताळणे कठीण झाले आहे. नागरिकांनी रेशन दुकानासमोरच मशीन पद्दत बंद करण्याचे नारे देऊन शासनाच्या ढिसाळ कारभारा विरोधात आवाज उठवला आहे. नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयीकडे पुरवठा विभागाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.