लोणी काळभोर : जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकीसारखा विचार न करता सर्व सभासदांनी राजकीय जोडे बाहेर ठेवून यशवंत कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेत सामील व्हावे. सर्वांनी सहकार्य केल्यास आपला कारखाना नक्कीच सुरु होईल, असे मत थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग काळे यांनी व्यक्त केले.
थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोणी काळभोर गटाची बैठक आज थेऊर फाटा येथील जिजाऊ मंगल कार्यालयात पार पडली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना पांडुरंग काळे बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी संचालक प्रभाकर काकडे होते.
यावेळी कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रा. के. डी. कांचन, माजी संचालक रघुनाथ चौधरी, ज्येष्ठ नेते अरुण घुले, रंगनाथ कड, हवेली पंचायत समितीचे माजी सभापती युगंधर काळभोर, श्रीनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष संदीप धुमाळ, कुंजीरवाडीचे माजी सरपंच संतोष कुंजीर, माजी उपसरपंच सुरेश कुंजीर, लोणी काळभोरचे माजी उपसरपंच अण्णासाहेब काळभोर, सरपंच योगेश काळभोर, ग्रामपंचायत सदस्य नागेश काळभोर, भरत काळभोर, भाजपचे युवा नेते कमलेश काळभोर, सुरेश कामठे, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष श्रीरंग काळभोर व सभासद शेतकरी उपस्थित होते.
गेली 12 वर्षे बंद असलेल्या थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया १ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला. त्यामुळे सभासदांनी गटनिहाय बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी उरुळी कांचन येथे एक बैठक झाली आहे. सर्व सहा गटात या बैठका होणार आहेत. या संदर्भात कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग काळे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायालयाने आदेश दिला आहे.
राजकारण बाजूला ठेवून सभासदांनी सहकार्य करण्याची गरज
‘कारखाना सुरू करण्यासाठी सभासदांनी धैर्याने पुढे येण्याची गरज आहे. सर्वप्रथम कारखाना सुरू करायला प्राधान्य देऊ, नंतर देणेदारांची देणी देऊ. राज्य शासनासहित बऱ्याच लोकांकडून कारखान्याला पैसे येणे बाकी आहेत. कोट्यवधी रुपयांची थकबाकी शिल्लक आहे. ही थकबाकी वसूल झाल्यास कारखाना सुरू करण्यासाठी आर्थिक अडचण येणार नाही.
संस्थापक अण्णासाहेब मगर यांनी साधनसंपत्ती हाती नसताना थेऊरच्या माळरानावर ५० वर्षांपूर्वी कारखाना सुरु केला होता. आज आपल्या हातात बरीच साधनसंपत्ती आहे. त्यामुळे कारखाना सुरू होऊ शकतो. फक्त राजकारण बाजूला ठेवून सर्व सभासदांनी प्रामाणिकपणे सहकार्य करण्याची गरज असल्याचे काळे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, यावेळी बहुतेक वक्त्यांनी कारखान्याची निवडणूक बिनविरोध करावी, असे मत व्यक्त केले. प्रा. के. डी. कांचन, रघुनाथ चौधरी, संतोष कुंजीर, सुरेश कुंजीर यांनीही मनोगत व्यक्त केले. उपस्थितांचे आभार अण्णासाहेब काळभोर यांनी मानले.