लोणी काळभोर (पुणे) : गणेशोत्सव वर्गणीच्या नावाखाली किराणा दुकानदाराला दमदाटी करून मारहाण केल्याची घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन परिसरात घडली. रविवारी (ता. १०) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास झालेल्या या घटनेचा व्हिडिओ सध्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेचा स्थानिक व्यापारी आणि दुकानदारांकडून निषेध केला जात आहे.
याप्रकरणी दिनेश भिकाराम गोरा (वय २०, रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी श्रीमंत काळभैरवनाथ प्रतिष्ठान मंडळाचे २ व अष्टविनायक मित्र मंडळाचे २ अशा चौघांवर गुन्हा दाखल केला. मात्र, लोणी काळभोर पोलीस काय कारवाई करतात याकडे लोणी स्टेशनसह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश गोरा यांचे लोणी स्टेशन परिसरात न्यू बालाजी किराणा स्टोअर्स नावाने किराणा दुकान आहे. मागील तीन दिवसांपूर्वी सार्वजनिक मंडळाच्या काही तरुणांनी गोरा यांना ३ हजार रुपयांची वर्गणीची पावती दिली होती. यावेळी रविवारी संध्याकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास १० ते १५ तरुणांचा गट हा वर्गणी मागण्यासाठी किराणा दुकानात घुसला.
यावेळी गोरा यांनी एवढी रक्कम देऊ शकत नसून तुम्ही काहीतरी कमी करून घ्या, असे म्हणाले. तेव्हा यातील एकाने त्याच्या कानाखाली जोरदार फटका मारला. पाठीमागे असलेल्या काही तरुणांनी दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त करून दमदाटी केली. तसेच पुन्हा दुकानात घुसून मारहाण केली. लोणी स्टेशन चौकात बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.
दरम्यान, याचवेळी त्या ठिकाणी स्थानिक गुन्हे (ग्रामीण) शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे यांनी हा प्रकार पाहिला व त्यांनी तात्काळ दुकानाकडे धाव घेतली. यावेळी ननवरे यांनी संबंधित मंडळाच्या कार्यकर्त्यांना सज्जड दम देऊन हुसकावून लावले. यावेळी हा वाद मिटला. यावेळी आजुबाजूच्या दुकानदारांनी मोठी गर्दी केली होती. या मारहाणीचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाली असून, लोणी काळभोर पोलीस काय कारवाई करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
पोलीस आयुक्तांच्या आदेशाला ‘केराची टोपली’..!
वर्गणीसाठी सक्ती करू नका, असे आवाहन पोलीस आयुक्त रितेश कुमार, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी बैठकीतून मंडळांच्या अध्यक्षांना केले होते. मात्र, पोलीस आयुक्त व पोलीस निरीक्षकांच्या आदेशाला काही मंडळानी केराची टोपली दाखवली आहे.
पावतीवर ना मंडळाचे नाव, ना नोंदणी क्रमांक..
यावर शक्कल लढवत काही गणेश मंडळांनी ‘सार्वजनिक गणेशोत्सव’ असा उल्लेख असलेल्या पावत्या छापल्या आहेत. या पावत्यांवर मंडळाचे नाव किंवा नोंदणी क्रमांक छापलेला नाही. वर्गणी गोळा करण्यासाठी धर्मादाय आयुक्तांकडे गणेशोत्सव मंडळाची नोंदणी असणे आवश्यक आहे. मात्र, या निमित्ताने किती गणेश मंडळाची नोंद लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आहे. याची माहिती नागरिकांना होणे गरजेचे बनले आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लीक करा..
लोणी काळभोर, कदमवाकवस्ती परिसरात २०० मंडळे..
लोणी काळभोर व कदमवाकवस्ती परिसरात २०० व त्यापेक्षा जास्त मंडळे आहेत. या प्रत्येकी मंडळाचे कार्यकर्ते येऊन दुकानदारांकडून जबरदस्तीने वर्गणी घेऊन जातात. अशाप्रकारे सर्व गणेश मंडळांना मागेल तेवढी वर्गणी द्यायची म्हटले तर अगोदरच भाड्याने असलेले दुकानच बंद करावे लागेल. पोलीस खात्याने तातडीने अशा गणेश मंडळांवर कारवाई करण्याचे धाडस दाखवावे अशी अपेक्षा व्यापारी वर्ग व्यक्त करत आहे.
दमदाटी, हाणामारी करून वर्गणी वसूल केल्यास कडक कारवाई..
याबाबत बोलताना लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण म्हणाले, “आगामी गणेशोत्सवादरम्यान गणपती मंडळांच्या कार्यकर्त्यांनी दमदाटी किंवा हाणामारी करुन व्यावसायिकांकडून वर्गणी वसूल करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे”.