Health News : अनेक लोकांना बसल्या बसल्या पाय हलवण्याची, पायाची बोटे हलवण्याची सवय असते. अशा हालचालींना इंग्लिशमध्ये ‘फिजिटिंग’ म्हटले जाते. या सवयी चांगल्या नसतात असे काहींचे म्हणणे असते. मात्र, तज्ज्ञांनी म्हटले आहे की, ही सवय आरोग्यासाठी चांगलीच ठरते. विशेषतः वजन घटवण्यासाठी बसल्या-बसल्या अशा हालचाली करणे लाभदायक ठरते.
फिजिटिंगकडे पूर्वी बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता; पण आता त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. यासंबंधी झालेल्या नवीन संशोधनातून समोर आले की, चंचलता आपल्याला निरोगी ठेवण्यात, वजन आटोक्यात ठेवण्यात आणि आपला स्ट्रेस मॅनेज करण्यात आयुष्यभर मदत करते. जर तुम्ही एकाच ठिकाणी स्थिर बसून राहत असाल तर ते चांगले नाही. पण जर तुम्ही बसलेले असताना हालचाल करत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी चांगले आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
फिजिटिंग म्हणजे दडपण घेणे, बेचैन असणे असे सहसा समजले जाते; पण काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, शरीराच्या एका भागाची एका लयीत होणारी हालचाल मेंदूतून नियंत्रित केली जाते. जगभरात 1975 पासून आतापर्यंत लठ्ठ लोकांच्या लोकसंख्येत तिप्पट वाढ झाली आहे.
दरम्यान, याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे बैठी जीवनशैली. यामुळे आपल्या शरीराचं मेटॅबोलिझम म्हणजेच चयापचय क्रिया मंदावते. यामुळे आपल्या. रक्तातल्या साखरेची पातळी रक्तदाब नियंत्रित करण्याची क्षमता प्रभावित होते. यामुळे आपल्या शरीरातील चरबीही काम करू शकत नाही; पण फिजिटिंगमुळे आपले वजन आटोक्यात राहण्यात मदत होते. कारण यामुळे आपण एका जागी स्वस्थ न बसता हालचाल करत असतो.