लोणी काळभोर (पुणे) : पूर्व हवेलीत महसूली क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वांत मोठी गावे समजल्या जाणाऱ्या लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या दोन गावांसाठी पूर्ण वेळ तलाठी नेमण्याची गरज आहे. मात्र, महसूल विभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘प्रशासकीय’ कारण पुढे करत, मागील काही दिवसांपासून पद्धतशीरपणे ‘तात्पुरता तलाठी’ (?) नेमण्याची परंपरा सुरु केली आहे. महसूल खात्यातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोणी काळभोर व कदमवाकवस्ती मधील “लोणी” फस्त करण्यासाठी पद्धतशीरपणे पूर्ण वेळ तलाठीपदाला फाटा देवून, ‘महसूल’च्या सारीपाटावर आपले कसब दाखविण्यास सुरुवात केली आहे.
‘कोणी पूर्ण वेळ तलाठी भाऊसाहेब देता का?’
महसूल विभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पूर्व हवेलीमधील काही हस्तींना हाताशी धरुन, तात्पुरत्या तलाठ्यांचा खेळ चालवला आहे. परिणामी सातबारा, फेरफार, सातबाऱ्यावर नाव लावणे, उत्पन्नाचा दाखला काढणे अशा विविध महसूली कामांसाठी तलाठी कार्यालयात येणारे नागरिक व खातेदार शेतकऱ्यांवर ‘कोणी पूर्ण वेळ तलाठी भाऊसाहेब देता का?’ अशी विनवणी करण्याची नामुष्की ओढवली आहे. मात्र, नागरिकांच्या आर्त हाकेला साद देणारे प्रशासन पूर्व हवेलीत नसल्याने, नागरिकांना यापुढील काळातही महसुली कामांसाठी हेलपाटेच मारावे लागणार, असे चित्र दिसत आहे.
ना नेत्यांना, ना प्रशासनाला सोयर सुतक…
तलाठी कार्यालय म्हटले की, नागरिकांची गर्दी डोळ्यांसमोर येते. सातबारा, फेरफार, सातबाऱ्यावर नाव लावणे, उत्पन्नाचा दाखला काढणे अशा विविध महसुली कामांसाठी नागरिकांना तलाठी कार्यालयात जावेच लागते. हवेलीमध्ये लोणी काळभोर व कदमवाकवस्ती तलाठी कार्यालयाला विशेष महत्त्व असून, याठिकाणी पूर्ण वेळ गाव कामगार तलाठी नसल्याने, त्यांची वाट पहाण्यासाठी नागरिकांना तलाठी कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागतात.
लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या दोन्ही गावांत डझनभर नेते असूनही, त्यांना जनतेच्या महसूली अडचणींबाबत सोयरसुतक न राहिल्याने, त्यांनी मूग गिळून गप्प राहणे पसंद केल्याचे दिसून येत आहे. अगदी महसूली क्षेत्रफळाच्या दृष्टीने लहान तलाठी सजांना पूर्ण वेळ तलाठ्यांची नेमणूक केली जाते. मग लोणी काळभोरकरांना पूर्ण वेळ तलाठी देण्यात प्रशासनाला कशाचे वावडे आहे, हे न उलगडणारे कोडे आहे.
लोणी काळभोर, कदमवाकवस्ती… दोन्ही गावे दुभती गाय…
लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ही दोन्ही गावे पुणे-सोलापूर महामार्गालगत असून, महसूली क्षेत्रफळही मोठे आहे. या ठिकाणाहून शासनाला महसूली उद्दीष्टापोटी जोरदार वसुली होत असते. लोणी काळभोरमध्ये तब्बल १ ते २३५४ गट नंबरचे सातबारा असून, कदमवाकवस्तीत १ ते ११७३ गट नंबर आहे. उत्तरेला मुळा-मुठा नदी तर दक्षिणेला रामदरा डोंगर, वडकी व फुरसुंगी असा भौगोलिक विस्तार या दोन्ही गावचा आहे. यावरून महसूली तलाठी सजा व त्याचा कार्यभार व कार्यविवरणाचा आलेख ध्यानात येतो.
याठिकाणी तलाठ्यांना अतिरिक्त चार्ज असल्याने नागरिकांना त्यांची वाट पाहत ताटकळत थांबावे लागते. लोणी काळभोर तलाठी कार्यालयात नेहमीच नागरिकांची गर्दी होत असते. हेलपाट्यामुळे बेजार झालेले नागरिक अनेकदा लोकप्रतिनिधींकडे तक्रारी मांडतात. मात्र, अतिरिक्त चार्जचे कारण देत तलाठी लोकप्रतिनिधींची बोळवण करत असून, मूळ सजा व अतिरिक्त सजा या दोन्ही ठिकाणचा कामांचा ताण अधिक असल्यामुळे कामांवर मर्यादा येत असल्याचे तुणतुणे वाजवतात.
लोणीसाठी सक्षम तलाठी न सापडणे, ही शोकांतिकाच!
लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या दोन्ही गावांच्या तलाठी पदाचा चार्ज मागील काही दिवसांपासून शिंदवणे येथील तलाठी भाऊसाहेबांकडे देण्यात आला होता. मात्र, सोमवारी (ता. ४ सप्टेंबर) महसूल विभागाने प्रशासकीय कारण पुढे करत, लोणी काळभोरचा तलाठी चार्ज न्हावी सांडसच्या तलाठ्यांकडे सोपवल्याचे जाहीर केले आहे. न्हावी सांडस या मूळ सजाचा कार्यभार सांभाळून, न्हावी सांडसच्या तलाठ्यांना लोणी काळभोर सजाचा कार्यभार सांभाळण्याचे निर्देश मिळाले आहेत. लोणी काळभोर ते न्हावी सांडस हे अंतर सुमारे ३० किलोमीटर आहे. त्यामुळे न्हावी सांडसच्या तलाठ्याला येथील लोणी काळभोरचा अतिरिक्त पदभार सोपवणे ही बाब सर्वसामान्य नागरिकांच्या समजण्यापलिकडची आहे. लोणी काळभोरचा पदभार देण्यासाठी महसूल विभागाला सोलापूर रोडला एकही सक्षम तलाठी सापडू नये, हीच एक शोकांतिका आहे.
लोणीच्या ‘लोण्या’साठी आटापीटा
“लोणी”च्या तलाठी पदाचा कायमस्वरुपी असो वा अतिरिक्त, पदभार आपल्यालाच मिळावा यासाठी अनेकांनी मागील काही दिवसांपासून महसूल विभागात फिल्डींग लावल्याची चर्चा सुरु होती. जिल्हातील काही नामांकित गावांप्रमाणेच येथे नागरिकांकडून माया मिळत असल्यानेच, महसूलमधील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोणी काळभोर व कदमवाकवस्तीमधील “लोणी” उपसण्यासाठी पद्धतशीरपणे पूर्ण वेळ तलाठीपदाला बाजूला सारुन महसूलच्या सारीपाटावर आपले कसब दाखवत असल्याच्या चर्चा चालू असतात. महसूल विभागाने सोमवारी काढलेल्या एका आदेशामुळे या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. मात्र, लोणी काळभोरला पूर्ण वेळ तलाठी का मिळू शकत नाही, याचे उत्तर मात्र कोणीही देण्यास तयार नाही.
दरम्यान याबाबत हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे यांच्याशी संपर्क साधला असता, ते बाहेरगावी असल्याने त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.