Indapur News : इंदापूर (पुणे) : दोन परप्रांतीय तरुणांमध्ये जेवण बनवण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एकाने दुसऱ्यावर कोयत्याने वार करून निर्घुण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बेडशिंग (ता. इंदापूर) ग्रामपंचायत हद्दीत शनिवारी (ता. ०१) रात्री हि घटना घडली आहे.
कोयत्याने वार करून निर्घुण खून
शुभम लालजी भारतीय (३५, लेडडी ता. मेजाखास, जिल्हा अलाहाबाद उत्तर प्रदेश) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर नीरजकुमार लालमणी कुशवाह असे खून करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी निलेश मारूती जांभळकर (३२, रा. राशीन ता. कर्जत जि. अहमदनगर) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कुशवाह याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदापूर तालुक्यातील बेडशिंग येथील मिलिंद जीवनधर दोशी यांची बारा एकर जमीन फिर्यादी जांभळकर यांनी वाट्याने करायला घेतली आहे. या शेतीत काम करण्यासाठी किसनकुमार रमेशकुमार कुशवाह, नीरजकुमार लालमनी कुशवाह, मनीष लालमनी कुशवाह आणि शुभम लालजी भारतीय हे उत्तर प्रदेश मधील कामगार या ठिकाणी काम करत आहेत. शनिवारी दुपारी नीरजकुमार आणि शुभम यांच्यात जेवण बनवण्यावरून वाद झाला होता. हा वाद जांभळकर यांनी मिटवला होता.
त्यानंतर सायंकाळी रात्री उशिरा नेहमीप्रमाणे हे सर्वजण कामावरून घरी आले. गावात सुरू असलेल्या मारुती महादेवाच्या मंदिरातील भंडाऱ्याचा त्यांनी आस्वाद घेतला. मात्र रात्री उशीरा साडेबारा वाजता घराच्या स्लॅपवर जांभळकर यांना जोरजोराने ओरडल्याचा आवाज आला. जांभळकर यांनी तात्काळ वरती जाऊन पाहिले असता नीरजकुमार कुशवाह हा कोयत्याने शुभम भारतीय याच्यावरती वार करत होता.
दरम्यान, जांभळकर यांनी इतर कामगारांच्या मदतीने जखमी झालेल्या शुभम भारतीय याला इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वी मृत झाल्याचे सांगितले.