पुणे : बहिण-भावाच्या प्रेमाचे प्रतिक म्हणून राखीपौर्णिमा साजरी केली जाते. बहिण भावाला ओवाळून राखी बांधते. ही राखी म्हणजे भावाने बहिणीला दिलेली सुरक्षेची हमी होय. असाच एक अनोखा कार्यक्रम पुण्यातील येरवडा जिल्हा कारागृहात गुरुवारी (ता.३१) पाहावयास मिळाला. आधार फाऊंडेशन व सत्यवीर मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीनं जिल्हा कारागृहात रक्षाबंधन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कारागृहात महिलांनी कैद्यांना राख्या बांधल्या.
आधार फाऊंडेशन व सत्यवीर मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने येरवडा कारागृहात रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांनी कैद्यांना राख्या बांधल्या. यावेळी आधार फाऊंडेशनचे संतोष ढेबे, उमेश वैद्य, सचिन गोरे, गणेश पारखे, गणेश कुंजीर, सोनल थोपटे, कांचन कुंजीर, पूनम वैद्य, सोनम वैद्य, सुवर्णा पारखे, गौरी गोरे, निकिता परदेशी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होती.
यावेळी बोलताना आधार फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रशांत थोपटे म्हणाले की, ‘माणूस जन्मत: गुन्हेगार नसतो, आपल्या हातून नकळत झालेल्या गुन्ह्यामुळे आपण शिक्षा भोगत आहात, यापुढे आपण एक चांगला माणूस म्हणून जगण्याचा हक्क आपण तयार करा. तसेच समाजातील वाईटपणा संपवा. शेवटी एक माणुसकी या नात्याने बंधनाचा एक धागा सुद्धा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचे परिवर्तन घडवू शकतो. याची जाणीव ठेवून दोन्ही कारागृहात राखीपौर्णिमा हा उपक्रम राबवण्यात आला.
रक्षाबंधनचा हा कार्यक्रम कारागृह अधीक्षक सुनील ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी उपअधीक्षक डॉ. भाईदास ढोले, पल्लवी कदम, वरिष्ठ तुरूंगाधिकारी आनंद कांदे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कारागृह शिक्षक तथा ग्रंथालय विभागप्रमुख अंगद गव्हाणे यांनी केले. या कार्यक्रमासाठी अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता व कारागृह महानिरीक्षक स्वाती साठे यांनी परवानगी दिली.
सर्वच स्तरातून उपक्रमाचे होतंय कौतुक
आधार फाऊंडेशन व सत्यवीर मित्र मंडळ ट्रस्टचा स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तर शिक्षा भोगत असलेलेले कैदी आपल्या मनगटावरील राखी बघून काही वेळ भारावून गेले होते. तसेच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. आधार फाऊंडेशनमधील सोनल थोपटे, कांचन कुंजीर, पुनम वैदय, सुवरणा पारखे, गौरी कोरे, निकिता परदेशी या महिलांनी कौटुंबिक जीवनातून वेळ काढून बंदी बांधवांना राख्या बांधल्या.
आधार फाऊंडेशनतर्फे यापुढेही कार्यक्रम राबवणार
आधार फाऊंडेशनतर्फे यापुढेही कारागृहामध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतील, असे सांगून बंदी बाधवांचे मनोरंजनातून प्रबोधन व्हावे, रिकाम्या वेळेचा सदुपयोग व्हावा म्हणून व्हॉलीबॉल, कॅरम, बुद्धिबळ सेट देखील लवकरच देण्यात येतील, असे आधार फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रशांत थोपटे यांनी सांगितले.