मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अडचणीत असलेल्या आणि भाजप नेत्यांसंबंधित असलेल्या सहा सहकारी साखर कारखान्यांना कर्जासाठी काही अटी घालून दिल्या होत्या. या अटींमुळे मोठी अडचण होत होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये हस्तक्षेप करत या घालून दिलेल्या अटी मागे घेण्याची वेळ सरकारवर आली. त्यातून माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्याशी संबंधित असलेल्या कारखान्यांना 225 कोटी कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
‘एनसीडीसी’ने राज्यात अडचणीत असलेल्या सहा सहकारी साखर कारखान्यांना राज्य सरकारच्या हमीवर ५४९.५४ कोटी रुपयांच्या खेळत्या भांडवलावरील कर्ज (मार्जिन मनी लोन) काही दिवसांपूर्वी मंजूर केले. मात्र, हे कर्ज मंजूर करताना घातलेल्या अनेक जाचक अटींची पूर्तता करताना कारखान्यांच्या संचालक मंडळाची चांगलीच दमछाक होत होती. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. या बैठकीत या कारखान्यांवर आणखी काही अटी घालण्याचा निर्णय झाला. त्यानुसार वित्त विभागाच्या सूचनेनुसार, सहकार विभागाने २१ ऑगस्ट रोजी आणखी एक आदेश निर्गमित करत या सहा कारखान्यांवर कर्जासाठी नव्या अटी लादल्या. त्यामुळे या कारखान्यांची आणखीनच अडचण होत होती.
दरम्यान, यातून मार्ग काढण्यासाठी आणि या जाचक अटी हटवण्यासाठी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखालील भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची भेट घेतली. याच भेटीमध्ये यासंदर्भातील शासन निर्णय मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता या कारखान्यांना कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अजित पवारांना मोठा धक्का
राज्यात शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी (अजित पवार गट) या तीन पक्षांचे सरकार सत्तेवर आहे. एकनाथ शिंदे हे या सरकारचे नेतृत्त्व करत आहेत. पण याच सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांनी कर्ज देण्याबाबत अनेक अटी लादल्या होत्या. या अटी हटवण्यासाठी भाजप नेते आग्रही होते. त्यानंतर भाजप शिष्टमंडळाने मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर अटी मागे घेण्याची नामुष्की सरकारवर आली आहे. अजित पवारांना हा एक मोठा धक्का मानला जात आहे.
कोणत्या कारखान्यांना किती कर्ज?
हर्षवर्धन पाटील यांच्याशी संबंधित इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना १५० कोटी आणि नीरा-भीमा सहकारी साखर कारखाना ७५ कोटी, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याशी संबंधित सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील शंकर सहकारी साखर कारखाना ११३.४२ कोटी, भाजप आमदार अभिमन्यू पवार यांच्याशी संबंधित लातूरच्या किल्लारी औसा येथील शेतकरी सहकारी साखर कारखाना ५० कोटी, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी संबंधित जालनाच्या भोकरदन तालुक्यातील रामेश्वर सहकारी साखर कारखाना ३४.७४ कोटी, भाजप खासदार मुन्ना महाडिक यांच्याशी संबंधित सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखाना १२६.३८ कोटी या कारखान्यांचा समावेश आहे.