Pune News : पुणे : पुणे शहर आणि परिसरात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीला लागल्याचे अनेक उदाहरणांवरून स्पष्ट होत आहे. किरकोळ कारणांवरून झालेल्या वादातून जबर मारहाण करण्याच्या घटनादेखील घडत आहेत. नुकतीच खडकी परिसरात एक थरारक घटना घडली आहे. कार्यालयासमोरील रस्त्यावर झाडू मारत असताना, अंगावर कचरा उडू नये यासाठी बाजूला होण्यास सांगूनही त्याने दुर्लक्ष केले. त्यानंतर कचरा उडाला म्हणून गुंडाने साथीदारांच्या मदतीने तरुणावर पालघनने वार करुन त्यांना जबर जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना खडकी बाजार येथील दर्गा वसाहतीत सोमवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली होती.
खडकी बाजार येथील दर्गा वसाहतीतील घटना
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत भूषण रामचंद्र पांगुडवाले (वय ४०, रा. गवळीवाडा, खडकी बाजार) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Pune News) याप्रकरणी खडकी पोलिसांनी शाहरुख ऊर्फ सुलतान कासम बागवान (वय २६), मोहसीन कासम बागवान (वय ३३) यांना अटक केली असून, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ससून रुग्णालयात जाऊन भूषण पांगुडवाले यांचा जबाब नोंदविला आहे.
दर्गा वसाहत येथे फिर्यादी यांचे भूषण केबल्स नावाने कार्यालय आहे. ते कार्यालयासमोरील रस्त्यावर झाडू मारत असताना शाहरुख बागवान दुकानासमोर थांबला होता. फिर्यादीने त्याच्या अंगावर धूळ उडू नये, यासाठी पलीकडे बसण्याची विनंती केली. मात्र, त्यावर काहीच प्रतिक्रीया न देता शाहरुख त्याच जागी थांबला. फिर्यादीने पुन्हा झाडण्यास सुरवात केल्यावर शाहरुख चिडला. शिवीगाळ करुन शाहरुख निघून गेला. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता फिर्यादी दुकानाबाहेर थांबले असताना शाहरुख हातात पालघन घेऊन हवेत फिरवत आला. त्याचा भाऊ मोहसिन देखील त्याच्याबरोबर होता. फिर्यादी दुकानात परत जात असताना शाहरुख याने पालघनने त्यांच्या मानेवार वार केला. (Pune News) दरम्यान, फिर्यादीने हा वार हातावर झेलला. पाठीमागून मोहसिन याने त्यांच्यावर वार केला. त्यांच्याबरोबरील अल्पवयीन मुलाने लाकडी दांडक्याने पाठीवर, मानेवर, हातावर मारहाण करुन गंभीर जखमी केले.
याबाबत खडकी पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक गुंजाळ या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : एकतर्फी प्रेमप्रकरणातून मुलीच्या आईला जीवे मारण्याची धमकी ; कोंढवा परिसरातील घटना..
Pune News : चांदणी चौकात लावण्यासाठी नकाशे तयार; भुलभुलैयातून प्रवाशांची सुटका होणार