पुणे : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेल्या तीन पत्ती जुगार अड्ड्यावर छापा टाकून मोठी कारवाई केली. यामध्ये 5 लाख 78 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, 10 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सोमवारी (दि.28) हडपसर येथील अॅमनोरा पार्क येथे करण्यात आली.
अॅमनोरा पार्क परिसरात पैसे लावून तीन पत्ती जुगार खेळत व खेळवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी याची गंभीर दखल घेत मिळालेल्या माहितीच्या आधारे, जुगार अड्ड्यावर छापा टकाला. त्यावेळी काही जण बेकायदेशीरपणे तीन पत्ती जुगार खेळत असल्याचे आढळून आले. याशिवाय 10 जण हुक्क्याचे सेवन करताना आढळून आले. हडपसर पोलिसांनी या दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, या कारवाईत पोलिसांनी 5 लाख 23 हजार रुपयांचे जुगाराचे साहित्य, मोबाईल, रोख 41 हजार 620 रुपये व 14 हजार 100 रुपयांचे हक्क्याचे फ्लेवर असा एकूण 5 लाख 78 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. सदर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, राजेश माळेगावे, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत यांच्या पथकाने केली.