पुणे : धावत्या क्रांती एक्स्प्रेसमध्ये मावस बहिणीवर लैंगिक अत्याचार करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पुणे जिल्हा सत्र न्यायलयाने दहा वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठविली आहे. हा निकाल सत्र न्यायाधीश एस. एस. गुल्हाणे यांच्या खंडपीठाने दिला आहे.
आरोपी मर्चंट नेव्हीमध्ये अभियंता असून त्याला न्यायालयाने दोषी ठरविले. याबाबत पीडित तरुणीने भोसरी एमआयडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी, तिची मावशी आणि आरोपी मावस भाऊ हे १४ जुलै २०१५ रोजी क्रांती एक्स्प्रेसने पुण्याकडे येत होते. भोपाळ रेल्वे स्थानक येण्यापूर्वी पीडित तरुणी रेल्वेतील प्रसाधनगृहात गेली. आरोपीने धमकावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या प्रकाराची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती.
त्यानंतर पिडीत तरुणी पुण्यात आल्यानंतर घडलेला सर्व प्रकार तिच्या मावशीला सांगितला. दुसऱ्या दिवशी आरोपी मावस भाऊ तिथे आला. त्याने पिडीत तरुणीला जमिनीवर ढकलून तिचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला. मावशी आणि मैत्रिणीने तिला सोडविण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी आरोपीने त्यांना मारहाण केली आणि तो घरातून पसार झाला.
दरम्यान, याप्रकरणी पीडित तरुणीने भोसरी एमआयडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार, आरोपीवर भोसरी एमआयडीसी पोलीस ठाणे आणि भोपाळ रेल्वे पोलिस ठाण्यात बलात्कार, खुनाचा प्रयत्न, धमकावणे यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे, पोलिस निरीक्षक प्रदीप पाटील, सहायक पोलिस फौजदार नारायण पवार यांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपीविरोधात दोषारोपपत्र दाखल केले.
या खटल्यात सरकार पक्षाकडून अकरा साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. यामध्ये पिडितेची मावशी आणि मैत्रिणीची साक्ष महत्त्वाची ठरली. आरोपीने मावस बहिणीवर बलात्कार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला असून, त्याला अधिकाधिक कठोर शिक्षा ठोठावण्यात यावी, असा युक्तिवाद अतिरिक्त सरकारी वकील ॲड. पुष्कर सप्रे यांनी केला. न्यायालयाने आरोपीला बलात्कार प्रकरणात दहा वर्षे आणि खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड केला आहे. दोन्ही शिक्षा एकत्र भोगायच्या आहेत.