नवी दिल्ली : ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमारने नुकतेच पीएसजी सोडून अल- हिलाल या फुटबॉल क्लबशी करार केला आहे. याचा मोठा फायदा भारतीय फुटबॉल चाहत्यांना होण्याची शक्यता आहे. कारण एशियन फुटबॉल क्लब चॅम्पियन्स लीग स्पर्धेत अल हिलाल आणि भारताचा एकमेव क्लब मुंबई सिटी एफसी हे एकाच ग्रुप डी मध्ये आहेत.
मुंबई सिटी एफसी आणि नेमारचा अल- हिलाल हा क्लब एकाच ग्रुपमध्ये असल्याने नेमार हा मुंबई सिटी एफसी विरुद्धचा सामना खेळण्यासाठी भारतात येण्याची शक्यता आहे. मुंबई सिटी एफसीचा सामना हा त्यांच्या होम ग्राऊंडवर होणार आहे.
मुंबई एफसीचे श्री शिवछत्रपती बालेवाडी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हे होम ग्राऊंड असल्याने पुणेकरांना नेमारला खेळताना पाहण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. यापूर्वी ख्रिस्तियानो रोनाल्डो हा पुण्यात खेळण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, ख्रिस्तियानो रोनाल्डोचा क्लब अल नासरचा एएफसी चॅम्पियन्स – लीगच्या ग्रुप ईमध्ये समाविष्ट आहे.
नियमानुसार, एकाच देशातील दोन संघ हे एकाच ग्रुपमध्ये समाविष्ट केले जात नाहीत. एशियन चॅम्पियन्स लीगचे ग्रुप स्टेजमधील सामने हे 18 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. मात्र, अल हिलालचा भारतातील सामना कधी होणार? हे अजून जाहीर झालेले नाही.
97.8 मिलियन डॉलर्स एवढी रक्कम प्राप्त..
नेमारने नुकतेच अल- हिलालकडे ट्रान्सफर प्रक्रिया पूर्ण केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्याला 97.8 मिलियन डॉलर्स एवढी रक्कम मिळाली आहे. या संघात कलिडोऊ, रूबेन नेवेस आणि माल्कॉम ही मोठी नावे देखील आहेत. या संघाचे प्रशिक्षक पोर्तुगालचे जॉर्ज जेसस हे आहेत.