संदीप टूले
Kedgaon News : केडगाव : आपल्या प्रियजणांचे अस्थी किंवा रक्षा विसर्जन करताना आपण अतिशय संवेदनशील असतो. प्रियजणांच्या अस्थी विसर्जित करताना शक्यतो नदीपात्रात व अथवा वाहत्या पाण्यात करतो. हे करण्यामागे आपल्याला सोडून गेलेल्या प्रियजणांच्या स्मृती कायम राहाव्यात यासाठी हा सारा प्रपंच असतो. मात्र, याला अपवाद ठरले आहे, ते राहू (ता.दौंड) या गावातील जुनं जाणतं व्यक्तिमत्व प्रगतशील शेतकरी दामू भिकू काळे (वय 75) यांचे 15 ऑगस्ट रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. निधनानंतर काळे परिवाराने अंत्यविधी केल्यानंतर अस्थी विसर्जन आळंदी किंवा पंढरपूर अशा पवित्र देवस्थानच्या ठिकाणी किंवा नदीपात्रात न करता त्या अस्थी काळे परिवाराने राहत्या घराच्या प्रांगणात झाडासाठी खड्डा खोदला व त्यामध्ये अस्थी विसर्जन करुन पारिजात झाडाची लागवड केली. समाजापुढे एक आगळा वेगळा आदर्श उभा केला.
समाजाला आदर्शवत दिशा
दौंड तालुक्यातील सर्व स्तरांमधून काळे परिवाराचे या विधायक स्तुत्य उपक्रमाचे विशेष कौतुक होत आहे. या परिवाराने पारंपरिक गोष्टींना फाटा देत आपल्या वडिलांच्या अस्थी पाण्यात सोडण्याऐवजी वृक्षारोपणासाठी वापरल्या आहेत. वडिलांच्या नावाने राहत्या घराच्या प्रांगणात खड्डा खोदून त्यात अस्थी विसर्जन करुन पारिजात झाडाची लागवड केली. त्यातून पुढील काही वर्षांत मोठे झाडं होईल, नव्या पिढीला सावली आणि फुले देईल आणि वडिलांच्या आठवणीही पुढील पिढीला होत राहील. समाजातील सर्वच घटकांनी अस्थी विसर्जन नदी पात्रात करण्याऐवजी आपल्या घरासमोर त्या व्यक्तीच्या आठवणी आयुष्यभर जाग्या राहतील, त्यानिमित्त एक तरी वृक्ष लागवड करावी. निश्चितपणे त्यापासून मिळणारी ऊर्जा आणि ताकद ही परिवाराला समाजाला आदर्शवत दिशा देणारी ठरु शकते. Kedgaon News
यावेळी माजी आमदार रंजना कुल, रमेश थोरात, भाजपचे वासुदेव काळे, आनंद थोरात, शिवाजी सोनवणे, वैशाली आबणे, नामदेव ताकवणे, वैशाली नागवडे, आप्पासाहेब पवार, महेश पासलकर, वीरधवल जगदाळे, मीना धायगुडे, सुशांत दरेकर, नितीन दोरगे, दिलीप हंडाळ, तात्यासाहेब ताम्हाणे, गणेश आखाडे, यांच्यासह विविध क्षेत्रातील आजी-माजी अधिकारी पदाधिकाऱ्यांकडून सांत्वन करण्यात आले. Kedgaon News
याबाबत बोलताना पत्रकार संतोष काळे म्हणाले , आमच्या वडिलांच्या आठवणी या वृक्षांमधून कायमस्वरूपी जाग्या राहतील. पारिजात वृक्षाचे संगोपन करून सेवा करण्याचे आम्हाला आयुष्यभर भाग्य लाभेल. प्रथमत: आपल्या कुटुंबापासून परिवारापासून अशा विधायक उपक्रमाची सुरुवात करा. निश्चितपणे समाजही अशी सुरुवात करेल.