संतोष गायकवाड
वाघोली : पीएमपीएमएल इलेक्ट्रिक बस डेपोवर पीएमपीएमएलच्या कंत्राटी कामगारांनी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. कंत्राटी कामगारांनी वारंवार वेतनवाढीचा प्रस्ताव पीएमपीएमएलकडे मांडला. परंतु, त्याची दखल पीएमपीएमएल प्रशासनाने अजूनही घेतली नाही. यामुळे कंत्राटी कामगारांना त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अवघड जात आहे. म्हणून कामगारांच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत कामगार हे आंदोलन सुरू ठेवणार आहेत.
पीएमपीएमएलचे कामगार विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. यामध्ये पीएमपीएमएलच्या बदली हंगामी चालका एवढे वेतन देण्यात यावे, कामगारांच्या कुटुंबास दवाखान्याचे कार्ड देण्यात यावे, पीएफची रक्कम जमा करण्यात यावी, पीएमपीएमएलमध्ये काम करत असल्याचे ओळखपत्र मिळावे व प्रवास करण्यासाठी मुभा मिळावी.
तसेच सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पीएमपीएमएलमध्ये वर्गीकरण करावे. या मागण्यांसाठी कामगारांनी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर पुण्यातील सर्व बस डेपोवर आंदोलन सुरू करणार असल्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला.