Educational News : दिल्ली : विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये महत्त्वपूर्ण बदल प्रस्तावित केले असून, विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण मूल्यांकनावर भर देण्यात आला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील तरतुदींची अंमलबजावणी करताना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने शालेय शिक्षण-परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत.
२०२४पासून ही नवीन पद्धती लागू करण्याचा विचार
शिक्षण मंत्रालयाने ही महत्वाची माहिती दिली आहे. दहावी व बारावीच्या अंतिम निकालात त्यापूर्वीच्या म्हणजेच अनुक्रमे नववी व अकरावीतील गुणांचाही विचार व्हावा, अशी आखणी करण्यास सांगण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
२००५ नंतर प्रथमच देशातील अभ्यासक्रमासाठी नवी संरचना तयार करण्यात येत आहे. यामध्ये नववी ते बारावीच्या परीक्षांबाबतच्या दूरगामी परिणामकारक शिफारशी करण्यात आल्या आहेत. या शिफारशी लवकरच सार्वजनिक मंचावर ठेवण्यात येतील व नागरिकांकडून हरकती व सूचना मागवण्यात येतील.
त्यांवर विचार करून अंतिम परीक्षा रचना करण्यात येणार आहे. परीक्षा रचना आणि अभ्यासक्रम अंतिम झाल्यावर शैक्षणिक वर्ष २०२४पासून ही नवीन पद्धती लागू करण्याचा विचार सुरू आहे.
नव्या रचनेनुसार, बोर्डाच्या परीक्षा आता वर्षातून दोनदा घेतल्या जातील. त्याचसोबत अकरावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमातही बदल करण्यात आले आहेत. तसेच विद्यार्थ्यांना दोन्ही सेमिस्टरचे सर्वोत्तम गुण निवडण्याची परवानगी दिली जाईल. शिक्षण मंत्रालयाच्या नवीन परीक्षा पॅटर्नवर आधारित बोर्ड परीक्षा विद्यार्थ्यांच्या विषयांचे आकलन आणि त्यांच्या स्पर्धात्मक कामगिरीचे मूल्यांकन करेल.
दरम्यान, सध्या बोर्डाच्या परीक्षा या केवळ कोचिंगद्वारे केलेली तयारी आणि विद्यार्थ्यांची लक्षात ठेवण्याची क्षमता यावरच आधारित असते, हे मंत्रालयाने मान्य केले आहे. सध्याच्या पद्धतीत दहावी आणि बारावीच्या अंतिम परीक्षेतील गुणांच्या दृष्टीनेच विचार केला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांवर ताण पडतो. तसेच अकरावी आणि बारावीमध्ये कला, वाणिज्य, विज्ञान या शाखांमधील विद्यार्थ्यांना आपल्याच विद्याशाखेतील विषय निवडण्याचे बंधन असते. मात्र नव्या अभ्यासक्रमात याविषयी लवचिकता असेल.
आता बहुविद्याशाखीय आणि सर्वांगीण शिक्षणावर भर दिला जाणार असून, अकरावी व बारावीच्या वर्गांची केवळ सायन्स, आर्ट्स किंवा मानव्यविद्या आणि कॉमर्स या शाखांमध्ये विभागणी केली जाणार नाही; तर निरनिराळ्या विद्याशाखांचे ज्ञान एकत्रित प्राप्त व्हावे या उद्देशाने आर्ट्स किंवा मानव्यविद्या, सायन्स, कॉमर्स आणि क्रीडा या विद्याशाखांचा समावेश असलेला बहुविद्याशाखीय अभ्यासक्रम तयार केला जाणार आहे.
आता इयत्ता अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना स्ट्रीम निवडण्याची सक्ती आता काढून टाकण्यात आली आहे. अशा स्थितीत या वर्गांमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे विषय निवडण्यास मोकळेपणा मिळेल. सध्या सर्वच मंडळांच्या अभ्यासक्रमांनुसार विद्यार्थ्यांना विज्ञान, वाणिज्य, कला, व्यावसायिक इत्यादींपैकी एकाची निवड करावी लागते.
२०२४ च्या शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी त्याप्रमाणेच पाठ्यपुस्तके विकसित केली जातील असे देखील शिक्षण मंत्रालयाने सांगितले आहे. अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दोन भाषांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. त्यापैकी किमान एक भाषा भारतीय असणे आवश्यक असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.
दरम्यान, सध्या केंद्रीय बोर्ड असो की राज्य मंडळ यांच्या सर्व परीक्षा वर्षातून एकदाच घेतल्या जातात. पण अंतर्गत मूल्यांकन आणि सहामाही परीक्षा शाळांद्वारे घेतल्या जातात.