पुणे : पुणे जिल्हा परिषदेत नोकरी लावतो सांगून एका तरुणाची १८ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या प्रकरणी एकास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
नामदेव कान्हू जायभाये (वय ५७, रा. लोहगाव) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे बीड जिल्ह्यातील खापरटोन गावाचे रहिवासी असून ते शेतकरी आहेत. आरोपी जायभाये याच्याशी त्यांची एका परिचिताने ओळख करुन दिली होती. ज्येष्ठ नागरिकाच्या मुलाला तसेच नात्यातील सहा जणांना जिल्हा परिषदेत नोकरी लावण्याचे आमिष जायभायेने दाखविले होते. त्यानंतर जायभायेने त्यांना पुण्यात बोलाविले. त्यांच्याकडून १८ लाख १३ हजार रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर त्याने जिल्हा परिषदेत नोकरी लावली नाही.
ज्येष्ठ नागरिकाने जायभायेशी संपर्क साधला. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला. तक्रार अर्जावरुन पोलिसांनी तपास केला. जायभायेला अटक करण्यात आली असून त्याने आणखी काही जणांची फसवणूक केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक सहाणे पुढील तपास करत आहेत.