पुणे : ऑनलाईन तीन पत्ती खेळण्यासाठी घरफोड्या करणाऱ्या एका २९ वर्षीय आरोपीला चतु:श्रृंगी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून पोलिसांनी तब्बल २७ लाख ५० हजार रुपयांचे ५५ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
मनीष जीवनलाल राय (वय-२९, रा. आऊट हाऊस, कोहिनुर प्लॅनेट, सांगवी रोड, पुणे, मुळ रा. गाव खमतारा, ता. बडवारा, जि. कटणी, मध्यप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत त्र्यंबकराव तुळशीराम पाटील (वय-७५ रा. स्पायरस शाळेजवळ, सांगवी रोड, औंध) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्र्यंबकराव पाटील यांचा फटिलायझर निर्मितीचा व्यवसाय असून औंध परिसरात राहत असलेल्या त्यांच्या बंगल्यातून ११ लाख रुपये रोख रक्कम व ५५ तोळे सोन्याचे दागिने असा एकूण ३८ लाख ५० हजार रुपयांची चोरी झाल्याची तक्रार शुक्रवारी (ता. १८) पोलीस ठाण्यात दिली होती.
सदर घरफोडीच्या गुन्ह्याचा तांत्रिक विश्लेषण करुन तपास करुन मनिष राय याला ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर करुन त्याची पोलीस कस्टडी घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान मनिष राय याला मोबाईल फोनवर ऑनलाईन तीनपत्ती खेळण्याचा नाद असून त्याने पैसे हरल्याने चोरी केल्याचे सांगितले.
दरम्यान, चोरी केलेल्या मुद्देमालापैकी ११ लाख रुपये ऑनलाईन तीन पत्ती खेळात हरल्याचे सांगितले. याबाबत पोलिसांनी तपास केला असता त्याने ११ लाख रुपये ऑनलाईन तीनपत्ती खेळात हरल्याचे त्याच्या बँक स्टेटमेंट वरून निष्पन्न झाले. आरोपीकडून चोरीला गेलेल्या मुद्देमालापैकी २७ लाख ५० हजार रुपये किंमतीचे ५५ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील करीत आहेत.