पुणे : शिवसेनेत फूट पडून राज्यात सत्तात्तर झाले. दीड महिन्यापूर्वी झालेल्या या सत्तासंघर्ष आता पुण्यातील गणेशोत्सवात दिसणार आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या वादात सामान्य व्यक्तीचे कसे मरण होत आहे, हे या देखाव्यात सादर करण्यात येणार आहे.
राज्यात गेल्या काही महिन्यांपासून जो सत्तासंघर्ष सुरू आहे त्या सत्तासंघर्षावर आधारित ‘सत्तामंथन’ हा देखावा नरेंद्र मित्रमंडळ सादर करत असून त्याची तयारीही पूर्ण झाली आहे.
‘सत्ताधाऱ्यांचे समुद्रमंथन आणि कार्यकर्त्यांचे मरण’ या नावाने सादर होणाऱ्या देखाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे समोरासमोर दाखवण्यात आले आहेत. हे दोघे सत्तेचे समुद्रमंथन करीत आहेत.
पुणे शहरातील नरेंद्र मित्रमंडळाने यंदाच्या देखाव्यात हा सत्तासंघर्ष मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कल्पक आणि ज्वलंत विषयांवरील आकर्षक देखाव्यांमुळे पुण्यातील गणेशोत्सवाची ख्याती देश-विदेशांतही पोहोचली आहे.