लोणी काळभोर (पुणे)– जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व भारतीय जनता पक्षाचे नेते प्रदीप कंद यांनी शुक्रवारी (ता. 26) कदमवाकवस्ती हद्दीतील कवडीपाट येथील नंदकुमार शितोळे व त्यांच्या कुटुंबियाची भेट घेऊन, त्यांचे सांत्वण केले. यावेळी प्रदीप कंद यांनी नंदकुमार शितोळे यांना रोख पन्नास हजार रुपयांची मदतही दिली.
पुणे सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली ) ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन चौकात मागिल आठवड्यात झालेल्या अपघातात, गायत्री नंदकुमार शितोळे (वय-१७) व राजश्री नंदकुमार शितोळे (वय-१०, रा. कवडीपाट, कदमवाकवस्ती, ता. हवेली) या सख्ख्या शाळकरी बहिणींचा मृत्यु झाला होता. या कुटुंबाची विचारपुस व सांत्वन करण्यासाठी जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष व भारतीय जनता पक्षाचे नेते प्रदीप कंद कवडीपाटला भेट दिली.
यावेळी प्रदीप कंद यांच्या समवेत भारतीय जनता पक्षाचे जिल्हा संघटनमंत्री अॅड. धर्मेंद्र खांडरे, उपाध्यक्ष प्रवीण काळभोर, जिल्हा सरचिटणीस सुदर्शन चौधरी, अंजिक्य कांचन, जिल्हा महिला उपाध्यक्षा पुनम चौधऱी, विकास चौधरी, कल्पना चौधरी, सोशल मिडीयाचे तालुकाध्यक्ष आदेश जाधव, भाजपाचे लोणी काळभोर शहराध्यक्ष कमलेश काळभोर, कदमवाकवस्ती शहराध्यक्ष विशाल गुजर, सुशिल काळभोर, शिवसेनेचे राजेश (सर) काळभोर, प्रदीप गुजर आदी उपस्थित होते.
दरम्यान नंदकुमार शितोळे यांची भेट घेतल्यानंतर पुणे प्राईम न्यूजशी बोलतांना प्रदीप कंद म्हणाले, मागिल आठवड्यात लोणी स्टेशन परीसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात, तब्बल तीन अल्पवयीन जीवांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. अल्पवयीन मुले अपघातात जाणे हे दुःख फार मोठे आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर सातत्याने होणारे अपघात टाळण्यासाठी पुढील काही दिवसात केंद्रिय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांची भेट घेऊन, या रस्त्याबाबतच्या सुधारणा करण्याबाबत मागणी करणार आहे.
तसेच लोणी काळभोर वहातुक पोलिस करत असलेल्या पठाणी वसुलीबाबतही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याशी चर्चा करुन, वहातुक पोलिसांच्या वागण्यावर निर्बंध लावण्याबाबत विनंती करणार आहे. या दोन अघातानंतरही वहातुक पोलिस सुधारणार नसेल तर मात्र भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरण्यास मागे पुढे पहाणार नाहीत असा इशाराही प्रदीप कंद यांनी यावेळी दिला.
दरम्यान प्रदीप कंद व त्यांच्या सहकाऱ्यांनी लोणी स्टेशन येथे जाऊन, तुषार साळुंखे यांची भेट घेऊन त्यांचेही सांत्वण केले. तुषार साळुंखे यांचा मुलगा, अथर्व याचा पण दोन दिवसापुर्वी अपघाती मृत्यु झाला होता.