Pune – Solapaur Highway News : पुणे : पुणे-सातारा महामार्गावरील दुमजली डबलडेकर पूल, हडपसर-यवत उन्नत मार्ग, पुणे-शिरूर-अहमदनगर ५६ किलोमीटरचा मार्ग, तळेगाव-शिक्रापूर-चाकण ५४ किलोमीटरचा मार्ग आणि नाशिक फाटा ते खेड मार्गाचा प्रकल्प अहवाल तयार आहे. १२ हजार कोटींचे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग डिसेंबर अखेर पूर्ण करण्यात येणार अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
पुण्यातील प्रकल्पांबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा…
पुणे शहरात एनडीए चौकातील (चांदणी चौक) राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वरील एकात्मिक पायाभूत सुविधा आणि रस्ते विकास प्रकल्प तसेच खेड व मंचर रस्ता चौपदरीकरणाच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आदी उपस्थित होते.
यापुढे बोलताना गडकरी म्हणाले, “पुणे विभागात पावणे दोन लाख कोटी रुपयांचे प्रकल्प देण्यात आले असून त्यातील काही पूर्ण झाले आहेत. पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुण्यात ५० हजार कोटींचे पूल हे रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागातर्फे उभारण्यात येतील आणि पुणे-बंगळुरू आणि पुणे ते संभाजीनगर हे दोन्ही रस्ते प्रकल्पही लवकरच पूर्ण करण्यात येतील.”
आगामी काळात पुणे हे देशाच्या विकासाचे केंद्र होणार आहे, पुणे अनेकांना रोजगार देणार आहे. महाराष्ट्रातील सर्वांधिक वेगाने विकसित होणारं शहरही पुणेच आहे. चोवीस तास पाणी आणि उत्तम रस्ते पुण्यासाठी आवश्यक आहेत. भारत सरकारच्यावतीने निश्चितच पुण्याचा विकासासाठी सहकार्य करण्यात येईल. पुण्यातील प्रकल्पांबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल.
शहरातील प्रदूषण कमी करा-
गडकरी म्हणाले, चांदणी चौक प्रकल्पासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. मोठ्या प्रकल्पांवरील खर्च आणि वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. पुण्यात हवेतून चालणाऱ्या एअर बसेसबाबतही पर्याय म्हणून अभ्यास करावा. पुण्यातील ऑटो रिक्षांना नवे परवाने देताना इलेक्ट्रिक आणि इथेनॉलवर चालणाऱ्या रिक्षांना परवाने दिल्यास प्रदूषण कमी होईल.