MPSC News : पुणे : भरती प्रक्रियेच्या एका जाहिरातीतील सर्व पदांसाठी एकच शुल्क आकारण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. याबाबतची माहिती पवार यांनी ‘ट्विट’ करून दिली आहे. त्यामुळे राज्यभरातील उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
राज्यभरातील उमेदवारांना दिलासा
राज्य सरकारच्या काही विभागांनी काढलेल्या पदभरतीच्या जाहिरातीत प्रत्येक पदासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क आकारल्याचे पुढे आले आहे. ही बाब उमेदवारांवर अन्याय करणारी असून, एका जाहिरातीतील सर्व पदांसाठी एकच शुल्क आकारण्यात यावे, अशा सूचना अजित पवार यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे यापुढे उमेदवारांना एकच शुल्क भरावे लागणार आहे.
सरळसेवा पदभरती प्रक्रियेत प्रत्येक पदासाठी स्वतंत्र शुल्क आकारले जाते. त्यामुळे वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे हजारो रुपये खर्च होतात. याबाबत आमदार रोहित पवार यांनी पावसाळी अधिवेशनात मुद्दा उपस्थित केला होता. या विषयावर अधिवेशनात चर्चा झाली होती. या पार्श्वभूमीवर पवार यांनी वित्त आणि नियोजन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून राज्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतला.
दरम्यान, या बैठकीत पदभरतीच्या जाहिरातीत प्रत्येक पदासाठी स्वतंत्र शुल्क आकारल्याच्या मुद्द्यावरही चर्चा झाली. या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या हजारो उमेदवारांना दिलासा मिळाला असल्याने आमदार रोहित पवार यांनी सरकारचे आभार मानले.