भीमाशंकर, (पुणे) : श्रावण महिन्यात भीमाशंकर मंदिरात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता सुरक्षिततेच्या दृष्टीने मंदिर परिसरात भाविकांना मोबाइल वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकर येथे श्रावण महिन्यात देशभरातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. याकाळात मंदिराच्या आवारात मोठ्या प्रमाणावर गर्दी असते.
मोबाइलचा वापर आणि छायाचित्रणास बंदी
यामुळे मंदिर प्रशासनाने मंदिराचा गाभारा, मुख्य मंडप आणि परिसरामध्ये गर्दी होऊन भाविकांची गैरसोय होऊ नये आणि सर्वांना दर्शन सुलभतेने व्हावे ; तसेच कुठलीही अनुचित घटना घडू नये, मंदिराचे पावित्र्य राखले जावे यासाठी मोबाइलचा वापर आणि छायाचित्रणास बंदी केल्याची माहिती देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
भीमाशंकर येथे येणाऱ्या भाविकांनी गाभारा, मुख्य मंडप आणि मंदिर परिसरात छायाचित्रण करू नये, तसेच मोबाइल बंद ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थानतर्फे करण्यात आले आहे. यामुळे मोबाइल वापरताना किंवा छायाचित्रण करताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर देवस्थानच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.