अरुण भोई
दौंड, (पुणे) : शाळेत शिपाई असलेल्या कर्मचाऱ्याने शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी केली.
हनुमंत काळे असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. काळे यांच्या आत्महत्येविषयी बोलताना गौतम कांबळे म्हणाले की, हनुमंत विठ्ठल काळे हे सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी येथील खाजगी अनुदानित शाळेत शिपाई म्हणून कार्यरत होते. २०१६-१७ पासून शालार्थ आयडी न मिळाल्यामुळे त्यांचा पगार बंद होता.
शालार्थ आयडी देण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालय पुणे येथील अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. गरीब परिस्थितीमुळे व अनेक दिवस पगार बंद असल्यामुळे ते पाच लाख रुपये देऊ शकले नाहीत. परिणामी, त्यांना शालार्थ आयडी मिळाला नाही व बरेच दिवस पगार बंद राहिल्याने निराश झालेल्या काळे यांनी शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली.
वृद्ध आई वडिलांचे तसेच पत्नी व लहान मुलांचे उपासमारीने होणारे हाल त्यांना पाहणे असह्य झाल्याने त्यांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवले. ही घटना शालेय शिक्षण विभागाच्या कारभाराला काळीमा फासणारी आहे. हनुमंत काळे यांच्या आत्महत्येची सखोल चौकशी करण्यात यावी. शालेय शिक्षकांसाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा न पुरवणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.