Educational News : पिंपरी : महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्याबरोबरच आता शिक्षकांच्या गुणवत्तेचे देखील मूल्यांकन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी, प्रगतीचे निरीक्षण करण्यासाठी महापालिकेने हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी भारतीय गुणवत्ता परिषद संस्थेची नेमणूक केली आहे. संस्थेने विद्यार्थ्यांचे मूल्यांकन सुरू केले असून, आतापर्यंत २३ महापालिका शाळांमधील चार हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यात आले आहे.
शिक्षकांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात येणार
विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांच्या गुणवत्तेचे मूल्यांकन केल्यामुळे शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचा कल ओळखण्यास, शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यास शिक्षण विभागाला मदत होणार आहे. सध्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागांतर्गत महापालिकेच्या ११० प्राथमिक व १८ माध्यमिक शाळा कार्यरत आहेत. या शाळांमध्ये ५५ हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मूल्यांकनाद्वारे आलेल्या निकालांचे विश्लेषण करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षमतेत सुधारणा करण्यासाठी योग्य कृती आराखडा तयार केला जाणार आहे. विद्यार्थ्यांचे मूल्यांकन झाल्यानंतर अहवाल पालकांना पाठविण्यात येणार आहेत. यामुळे पालकांना विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी समजून घेता येईल.
या उपक्रमाअंतर्गत तज्ज्ञांकडून १ हजार ३०० पेक्षा जास्त शिक्षकांचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. शिक्षकांसाठी कृती आराखडा विकसित केला जाणार आहे. शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी हे तज्ज्ञ धोरणात्मक सहाय्य देणार आहेत. शिक्षकनिहाय आणि विद्यार्थीनिहाय अहवाल तयार करण्यात येणार आहे. या अहवालाच्या दृष्टीने तीन वर्षांसाठी विद्यार्थी, शिक्षकांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांच्या आरोग्य संबंधित समस्या ओळखून दूर करण्यासाठी महापालिका प्रत्येक विद्यार्थ्याचा आरोग्य अहवाल तयार करणार आहे. त्याचा आढावा विस्तृत आयटी प्लॅटफॉर्मद्वारे घेण्यात येणार असून तो पालकांना पाठविण्यात येणार आहे. विद्यार्थी, शिक्षकांचे मूल्यमापन पालिकेच्या शाळांच्या शिक्षण व्यवस्थेतील परिवर्तनाच्या प्रवासाची सुरुवात आहे. मूल्यमापनाद्वारे विद्यार्थ्यांचा कल ओळखून त्यावर प्रभावीपणे काम करणे हा हेतू आहे. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला आणि शेवटी केल्या जाणाऱ्या मूल्यमापनामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात, कौशल्यामध्ये भर पडते. प्रभावी शैक्षणिक धोरण आखण्यास मदत मिळेल, असे पिंपरी-चिंचवड आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.