Indapur News : इंदापूर, (पुणे) : किरकोळ कारणावरून नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचा ठेकेदार व माजी नगरसेवकावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. सावतामाळीनगर मधील बावडा वेस नाक्याजवळ मंगळवारी (ता. ०८) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. (Indapur News)
गंभीर दुखापत
किरण नामदेव शिंदे (वय २३, रा. बावडा वेस नाका, माळीगल्ली, इंदापूर) असे हल्ला केलेल्या आरोपीचे नाव आहे. सुधीर किसन पारेकर (वय ३०, रा. वनगळी, ता. इंदापूर), राजेश हरीदास शिंदे (वय ५४, रा. सावतामाळीनगर, इंदापूर) असे हल्ल्यात जखमी झालेल्या दोघांची नावे आहे. या घटनेत पारेकर यांच्या कपाळावर गंभीर दुखापत झाली आहे. तर शिंदे यांच्या दंडावर व हातावर जखम झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधीर पारेकर हे इंदापूर नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे ठेकेदार म्हणून काम करतात. तर राजेश शिंदे हे इंदापूर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक आहेत. पारेकर हे येथील बावडा वेस नाक्या लगतच्या भागात डास निर्मूलनासाठी धुरळनीचे काम करून घेत होते. यावेळी आरोपीने ठेकेदार पारेकर यांच्याकडे धुरळनी यंत्राची मागणी केली.
मात्र, धुरळनीचे यंत्र गरम झाल्याने ते देण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे आरोपीने चिडून पारेकर यांच्यावर कोयत्याने हल्ला चढविला. त्यानंतर याच भागातील माजी नगरसेवक राजेश शिंदे यांनी आरोपीच्या वडिलांना शिवीगाळ केली होती. याचा राग धरून आरोपीने शिंदे यांच्यावरही कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात पारेकर यांच्या कपाळावर गंभीर दुखापत झाली आहे. तर शिंदे यांच्या दंडावर व हातावर जखम झाली आहे. तपास इंदापूर पोलीस करीत आहेत. (Indapur News)