Big Breaking पुणे : भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठातावर (डिन) लाचप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. या अधिष्ठाताला 16 लाख रुपयांच्या लाचप्रकरणी अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Big Breaking)
आशिष श्रीनाथ बनगिनवार (वय 54) असे या अधिष्ठाताचे नाव आहे. ते पुणे महानगरपालिकेच्या वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत असलेल्या महाविद्यालयात अधिष्ठाता पदावर कार्यरत आहेत.
तक्रारदार यांचा मुलगा एनईईटी परीक्षा – 2023 मध्ये उत्तीर्ण झाला होता. त्याची एमबीबीएसच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्याच्या पहिला कॅप राऊंडमध्ये पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय येथे इन्स्टिट्यूशनल कोट्यातून निवड झाली होती. त्यावेळी तक्रारदार त्यांना भेटण्यासाठी गेले होते.
याचदरम्यान, बनगिनवार यांनी दरवर्षाची शासनमान्य विहित फी 22 लाख 50 हजार रूपये व्यतिरिक्त प्रवेशासाठी 16 लाख रूपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 16 लाख रुपये देण्याचे ठरले. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या 16 लाखांपैकी पहिला हफ्ता 10 लाख रुपये स्वीकारताना बनगिनवार यांना रंगेहाथ पकडले.