गणेश सुळ
Kedgaon News : केडगाव : हिमोफिलस इन्फ्लूएन्झा टाइप बी (हिब) हा बॅक्टेरिया आहे, ज्यामुळे प्रामुख्याने मुलांना संसर्ग होतो आणि न्यूमोनिया व मेंदूज्वरसारखे प्राणघातक आजार होऊ शकतात. हा धोका लक्षात घेवून केंद्र सरकारने महाराष्ट्रासह काही निवडक राज्यांमध्ये राष्ट्रीय लसीकरण उपक्रमांतर्गत पेंटाव्हॅलंट लसीकरण कार्यक्रम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. देलवडी (ता. दौंड) येथील आरोग्य केंद्राचे कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी आपल्या परिसरातील ऊसतोडणी कामगारांच्या अल्पवयातील मुलांसाठी विविध लसीकरणाची मोहीम राबवली आहे.
अल्पवयातील मुलांसाठी विविध लसीकरणाची मोहीम
दरवर्षी जगात पाच वर्षांखालील अधिक बालके हिबमुळे दगावतात. त्यापैकी भारतामध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्या बालकांचे प्रमाण काही टक्क्यांमध्ये आहे. हिब रोगातून वाचलेली बालके कायमस्वरुपी अपंग अथवा कर्णबधीर होतात. अथवा त्यांच्या मेंदूला इजा पोहोचते. हिमोफिलस इन्फ्लूएन्झा टाइप बी (हिब) लसीकरणाने (व्हॅक्सिनेशनने) हिब संसर्ग प्रभावीपणे प्रतिबंधित करता येतो. यामध्ये प्रामुख्याने बीसीजी, हेपिटायटिस ‘बी’ आदी प्रकारचे पेंटाव्हॅलंट असे लसीकरणाचे डोस दिले जातात. विशेष म्हणजे हे लसीकरण आरोग्य विभगाचे कर्मचारी व त्याची संपूर्ण टीम ही ऊस तोडणी कामगार ज्याठिकाणी काम करत आहेत, अशा ठिकाणी स्वतः जाऊन देत आहेत. (Kedgaon News)
गर्भवती महिला, लहान बालके यांच्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढावी, आजारांबाबत जागृती व्हावी, यासाठी देलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राकडून दक्षता घेतली जात आहे. बालकांचे घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, हेपिटायटिस बी आणि हिब (हिमोफीलस इन्फ्लूएन्झा टाईप बी) या पाच प्राणघातक रोगांपासून संरक्षण व्हावे, यासाठी लसीकरण मोहीम सुरू आहे. भारतामध्ये डीपीटी (घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात आणि हेपिटायटिस बी) यांचा समावेश नियमित लसीकरण कार्यक्रमात या आधीच करण्यात आला आहे. यामध्ये हिब लस नव्याने समाविष्ट करण्यात आली आहे. एकत्रितपणे या समुच्चयाला ‘पेंटाव्हॅलंट’ असे संबोधण्यात येते. (Kedgaon News)
हिब लसीमुळे हिमोफीलस इन्फ्लूएन्झा टाईप बी जिवाणूद्वारे होणाऱ्या न्युमोनिया, मेनिंजायटिस, बॅक्टेरेमिया, एपिग्लोटायटिस, सेप्टिक आर्थ्रायटिस आदींसारख्या गंभीर रोगांना प्रतिबंध करता येऊ शकतो. पेंटाव्हॅलंट लस दिल्याने बालकाला सुई वारंवार टोचावी लागत नाही आणि बालकांचे घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, हेपिटायटिस बी आणि हिब (हिमोफीलस इन्फ्लूएन्झा टाईप बी) या पाच रोगांपासून संरक्षण मिळते. (Kedgaon News)
बालवयात होणाऱ्या रोगांना प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण ही सर्वज्ञात आणि सर्वात प्रभावी पद्धत आहे. भारत सरकारने अंमलबजावणी केलेल्या सार्वत्रिक लसीकरण उपक्रमामुळे (युआयपी) लसींच्या वापराद्वारे टाळता येण्याजोग्या रोगांना (व्हीपीडी) प्रतिबंध आणि नियंत्रित करण्याबाबत उल्लेखनीय कामगिरी करण्यात आलेली आहे. पेंटाव्हॅलंट लसीचा कार्यक्रम हाती घेण्यात आल्याने हिमोफीलस इन्फ्लूएन्झा टाईप बी (हिब) या जिवाणूद्वारे होणाऱ्या न्युमोनिया आणि मेनिंजायटिस या रोगांचे प्रमाण आणखी कमी होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन आरोग्यसेवक रानु नेवसे यांनी केले.
याबाबत बोलताना देलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविका रेखा टुले म्हणाल्या की, बालकाच्या माता-पित्यांनी, पालकांनी आरोग्यसेविका, आशा कार्यकर्ती अथवा जवळच्या शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. आपले ‘माता व बालक सुरक्षा कार्ड’ नेहमी आपल्याजवळ बाळगा. ही लस सर्व शासकीय रुग्णालयात मोफत उपलब्ध आहे. आपल्या बालकांचे घातक रोगांपासून संरक्षण करण्यासाठी लसीकरणाची कास धरायला हवी.